महाराष्ट्रात महाविकास आघाडीमधील युती 5 वर्षांची आहे, कायमस्वरूपी नाही- Congress President Nana Patole
Nana Patole | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात युतीमध्ये सरकार चालवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमधील दरी वाढत असल्याचे दिसत आहे. मुंबई महापालिकेसह राज्यातील दहा महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. कॉंग्रेसकडून या निवडणुका स्वबळावर लढवणार असे सांगण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधत म्हटले होते की, जर कोणी एकटे निवडणुका लढवण्याबाबत भाष्य केले तर, लोक चपलेने मारतील. यावर मित्रपक्षाकडून आलेल्या अशा वक्तव्याला उत्तर देताना प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Congress President Nana Patole) म्हणाले आहेत की, याबाबत जनताच निर्णय घेईल.

नाना पटोले म्हणाले की, राज्यात पाच वर्षांसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे युती सरकार स्थापन झाले, ही काय कायमस्वरूपी युती नाही. नाना पटोले यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, स्वबळाचा नारा लावणे चुकीचे नाही. त्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. असा नारा दिल्याने महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही. ते पुढे म्हणाले की, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 5 वर्षांसाठी युती सरकार स्थापन करण्यास शब्द दिला आहे, त्यामुळे कॉंग्रेस 5 वर्षांसाठी महाविकास आघाडी सरकारमध्ये असेल.

उद्धव ठाकरे हे कोणाविषयी बोलत आहेत याविषयी स्पष्टता नाही, असे पटोले यांनी पत्रकारांना सांगितले. ठाकरे यांनी शिवसेनेच्या 55 व्या स्थापना दिनी एक पक्षअध्यक्ष म्हणून टिप्पणी केली होती, मुख्यमंत्री म्हणून नव्हे. भाजपसुद्धा एकटे निवडणुका लढवण्याची चर्चा करत आहे. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजप या चारही पक्षांनी विधानसभा निवडणुका एकट्याने लढवल्या आहेत, असे पटोले म्हणाले. (हेही वाचा: Maharashtra: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वबळाच्या घोषणेवरुन काँग्रेसवर अप्रत्यक्षरित्या टीका)

ते पुढे म्हणाले की, भाजपला रोखण्यासाठी आम्ही 2019 मध्ये महा विकास आघाडी सरकार स्थापन केले. ही काय कायमची युती नाही. प्रत्येक पक्षाला आपली संघटना बळकट करण्याचा अधिकार आहे. काँग्रेसमध्ये स्वबळावर लढण्याबाबतचे एकमत आहे. आम्ही स्वबळावर लढणार असून त्याची तयारी सुरू झाली आहे.