औरंगाबाद (Aurangabad) शहराच्या नामांतरावरुन महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) चांगलच वाद पेटल्याचे दिसत आहे. याच मुद्द्यावरुन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. औरंगाबाद नामांतरावरून निर्माण झालेल्या वादावर आमच्या तिन्ही पक्षांचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी हे एकत्र बसून मार्ग काढतील. मात्र, यामध्ये काही लोक जाणीवपूर्वक महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अंतर पडावे, यासाठी प्रश्न निर्माण करत आहेत, असे अजित पवार म्हणाले आहेत.
नुकताच अजित पवार यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. दरम्यान अजित पवार म्हणाले की, “औरंगाबादच्या नामांतरावरुन निर्माण झालेल्या वादावर आमच्या तिन्ही पक्षांचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी हे एकत्र बसून मार्ग काढतील. मात्र, यामध्ये काही लोक जाणीवपूर्वक महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अंतर पडावे, यासाठी प्रश्न निर्माण करत आहेत. आघाडीतील तिनही पक्ष महाराष्ट्राच्या विकासाकरिता एकत्र आलेले आहेत. यासाठी आम्ही समान कार्यक्रम आखलेला आहे. तो कार्यक्रम राबवत असताना त्यामध्ये कधीतरी असा प्रसंग येतो आणि त्यातून आम्ही समोपचाराने मार्ग काढू” असे अजित पवार म्हणाले आहेत. हे देखील वाचा- मुंबई: मिरारोडच्या हॉटेलमध्ये NCB ची रेड, ड्रग्ज पेडलरसह टॉलिवूड अभिनेत्रीला घेतले ताब्यात
महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीची स्थापना केली आहे. मात्र, या सरकारमधील तिन्ही पक्ष भिन्न विचाराचे असून हे सरकार जास्त काळ टिकणार नाही. तसेच महाविकास आघाडीचे सरकार अंतर्गंत वादातून पडेल, अशी टीका विरोधी पक्षांकडून वारंवार केली जात आहे. यामुळे विरोधी पक्षांचे भाकीत खरे ठरते की काय? हे येत्या काही काळातच स्पष्ट होईल.