पश्चिम बंगाल (West Bengal राज्यात डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद देशभरातील वैद्यकीय क्षेत्रात उमटत आहेत. या हल्ल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने ( Indian Medical Association) आज (सोमवार, 17 जून 2019) 24 तासांचा बंद पुकारला आहे. महत्त्वाचे म्हणजे या बंदमध्ये राज्य रेडिओलॉजी अॅण्ड इमेजिंग संघटना आणि खासगी डॉक्टर संघटनाही सहभागी होणार आहेत. त्यामुळे त्याचा ताण राज्यातील वैद्यकीय सेवेवर पडणार असून, राज्यातील वैद्यकीय सवा ठप्प होण्याचा संभव आहे. असे घडले तर, रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होणार आहेत.
महत्त्वाचे म्हणजे या बंदमुळे राज्यातील एमआरआय, सीटीस्कॅन, एक्स-रे, सोनोग्राफी इत्यादी सेवा बंद राहणार आहेत. त्यातच खासगी डॉक्टरांची संघटनाही या बंदमध्ये सहभागी आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता तातडीने मिळणाऱ्या इतर सेवा बंद राहणार आहेत. त्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागणार आहे. (अधिक माहितीसाठी हेही वाचा, पश्चिम बंगाल मध्ये डॉक्टरला मारहाणीच्या निषेधार्थ देशभरातील डॉक्टरांचा 17 जून ला संप, बंद असणार 'या' आरोग्य सुविधा)
दरम्यान, डॉक्टरांवरील हल्ले हा मुद्दा प्रदीर्घ काळापासून चिंतेचा आणि चर्चेचा बनला आहे.पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या प्रकरणानंतर ही चिंता अधिकच वाढवली आहे. या पार्श्वभूमिवर ‘आयएमए’शी संलग्न डॉक्टर गेल्या शुक्रवारपासून काळ्या फिती लाऊन काम करत आहेत. त्यानंतर डॉक्टरांवरील हल्ल्यांच्या घटनांकडे सरकार आणि जतनेचे अधिक लक्ष वेधून घेण्यासाठी 24 तासांचा बंद पाळण्याचा निर्णय 'आयएमए' ने घेतला. मात्र, या बंदमध्ये अपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरु राहणार आहेत. इतकाच काय तो रुग्णांना दिलासा.