वाहन चालकांनी आपला थकीत दंड भरला नसेल तर त्यांनी वेळीच सावधान होण्याची गरज आहे. कारण, वाहतूक पोलिसांनी ई चलानद्वारे केलेल्या दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या वाहन चालकांची प्रकरणे उच्च न्यायालयात नेण्याची तयारी केली आहे. त्यानुसार वाहन चालकाने येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत दंड न भरल्यास त्याला नोटीस पाठविली जाणार आहे. सुनावणी वेळी वाहन चालक हजर न राहिल्यास त्यांना न्यायालयाद्वारे वॉरंट काढून अटक केले जाईल, असे मुंबई वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी सांगितले आहे. (हेही वाचा - मुंबई: वाहन चालवताना 'या' गोष्टींची घ्या काळजी; अन्यथा 3 महिन्यांसाठी होईल Driving Licences रद्द) वाहन चालकाने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्याकडून चलान आकारले जाते. आता नवीन नियमांनुसार, देशात ई चलान प्रणालीद्वारे चलान भरण्याची सुविधा वाहन चालकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार, वाहन चालकाला दंड भरण्यासाठी काही दिवसांची मुदत दिली जाते. परंतु, राज्यातील अनेक वाहन चालकांनी आतापर्यंत हा दंड भरलेला नाही. त्यामुळे अशा वाहन चालकांविरोधात वाहतूक विभागाने कारवाईचा बगडा उचलला आहे.
हेही वाचा - Driving Licence Renewal नियमांमध्ये झाला हा मोठा बदल; असे नाही केले तर पुन्हा द्यावी लागेल लर्निंग टेस्ट
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर ई चलान प्रणालीत दंड भरण्याची सक्ती केली जात नाही. तसेच वाहन, वाहनाची कागदपत्रे किंवा परवाना जप्त केला जात नाही. त्यामुळे दंड भरण्याबाबत वाहन चालक गंभीर नाहीत. यामुळे दंड न भरणाऱ्या वाहन चालकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. हा सर्व प्रकार लक्षात घेऊन वाहतूक विभागाने थकविलेले ई-चलान भरण्यासाठी आणखी 10 दिवसांची म्हणजे 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 30 नोव्हेंबरनंतर वाहन चालकांनी दंड न भरल्यास त्यांना नोटीस पाठविण्यात येईल. त्यानंतर वाहन चालक सुनावणी वेळी हजर न राहिल्यास त्याच्या विरोधात वॉरंट काढून अटक केली जाईल. तसेच न्यायालयीन आदेशानुसार दंडाची योग्य रक्कम ठरवली जाईल, असेही पांडे यांनी सांगितले.
वाहतूक विभागाने थकित वाहन चालकांना यापूर्वी अनेकदा दंड भरण्यास सांगितले होते. मात्र, वाहन चालक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे अशा वाहन चालकांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा ईशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे.