Uddhav Thackeray On MVA: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप व शिंदे गटातील आमदारांवर जहरी टीका केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर जाऊन पाप केलं नाही, माझ्याच लोकांनी मला धोका दिला. या दोन्ही पक्षांनी मला साथ दिली, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडाची (Maha Vikas Aghadi) महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी महाविकास आघाडीच्या डिनर डिप्लोमसीमध्ये उद्धव ठाकरे बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या 40 आमदारांना घेऊन भाजप पक्षासोबत युती करत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. या सर्व प्रकारानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन चूक केली, अशी टीका त्यांच्यावर करण्यात येत होती. मात्र, आता उद्धव ठाकरे यांनी या टीकेला सडेतोड उत्तर दिलं आहे. (हेही वाचा -Shiv Sena: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात अंतर्गत वाद, माजी आमदाराची संपर्कप्रमुख पदावरुन हकालपट्टी)
यावेळी उद्धव ठाकरे यांनी कसबा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं. भाजप ही कीड आहे. ज्यांच्यासोबत राहतात त्यांना संपवून टाकतात. आपण तिन्ही पक्ष एकत्र राहिलो तर कसबासारखे यांचे अनेक बालेकिल्ले उद्ध्वस्त करू शकतो. लोकसभा निवडणुकीत तिन्ही पक्षांनी एकत्र लढले पाहिजे. कोणत्या जागा देण्याबाबत काही तडजोडी कराव्या लागल्या तरी कराव्यात. नाहीतर 2024 लोकसभा शेवटची निवडणूक असेल, असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, कसबा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना बहुमत मिळाले. तर भाजप उमेदवार हेमंत रासने यांना पराभव स्विकारावा लागला. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात पराभव झाल्याने विरोधकांकडून भाजपवर टीका करण्यात येत आहे. अशातचं आता उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीने एकत्र येऊन लढलं पाहिजे, असं मत व्यक्त केलं आहे.