I Am Responsible: 'मी जबाबदार' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून नवीन मोहिमेची घोषणा
CM Uddhav Thackeray (Photo Credits: ANI/Twitter)

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज जनतेशी संवाद साधला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जनतेला संबोधित केले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढत असून राज्यात दुसऱ्या लाटेची भिती त्यांनी व्यक्त केली आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली की नाही? हे लवकरच समजणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या काळात नागरिकांनी मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग, वारंवार धुणे गरजेचे आहे. तसेच माझे कुटुंब, माझी जबाबदारीनंतर उद्धव ठाकरे यांनी मी जबाबदार या नवीन मोहिमेची घोषणा केली आहे.

लॉकडाऊन संदर्भात उद्धव ठाकरे म्हणाले की, "राज्यात लॉकडाऊन करायचा का? हा प्रश्न मी तुम्हाला विचारत आहे. या प्रश्नाचे उत्तर मी पुढील आठ दिवस तुमच्याकडून घेणार आहे. महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन नको असलेले नागरिक मास्क घालतील, सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करतील. पण ज्यांना लॉकडाऊन लावायचा असेल ते नियमांचे पालन करणार नाहीत, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेप्रमाणे आता मी जबाबदार ही मोहिम राबवूया, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. हे देखील वाचा-Uddhav Thackeray Address To Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले स्पष्ट

महाराष्ट्रात सध्या 53 हजार ऍक्टीव्ह रुग्ण आहेत. तर, अमरावती जिल्ह्याची परिस्थिती चिंताजनक आहे. मुंबईमध्येही रुग्ण दुप्पट झाली असून कोरोनाची दुसरी लाट दरवाज्यावर धडक मारत आहे, यामुळे पुन्हा एकदा आपल्याला बंधन पाळावी लागणार असल्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, औरंगाबादबरोबर विदर्भातील नागपूर, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांमध्येही करोनाने डोके वर काढले आहे. इतर जिल्ह्यातही रुग्णांची संख्या वाढताना दिसत असून, राज्य सरकारकडून नागरिकांना सूचनांचे पालन करण्याचे व खबरदारी घेण्याचे आवाहन केले जाते आहे.