Uddhav Thackeray Address To Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले स्पष्ट

महाराष्ट्रात कोरोना अटोक्यात येत असल्याची चिन्ह दिसत असताना राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. राज्यातील विविध शहरात कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रसासनाकडून कठोर पावले उचलली जात आहेत. तसेच राज्य शासनाच्या आदेशाचे व नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जात आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (21 फेब्रुवारी) राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केले आहे.

नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठीचे नियम पाळले नाही आणि संसर्गाचं प्रमाण असेच सुरु राहिल्यास आपल्याला राज्यात लॉकडाऊन करावा लागेल, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. तसेच "राज्यात लॉकडाऊन करायचा का? हा प्रश्न मी तुम्हाला विचारत आहे. या प्रश्नाचे उत्तर मी पुढील आठ दिवस तुमच्याकडून घेणार आहे. महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन नको असलेले नागरिक मास्क घालतील, सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करतील. पण ज्यांना लॉकडाऊन लावायचा असेल ते नियमांचे पालन करणार नाहीत, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेप्रमाणे आता मी जबाबदार ही मोहिम राबवूया, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- पुण्यात 'लॉकडाऊन' नाही, पण मायक्रो कंटेन्मेंट झोन लागू करण्याचा विचार सुरू; महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पाश्चिमात्य देशांमध्ये लॉकडाऊन गेल्या एक दीड महिन्यापासून आहे. ब्रिटनमध्ये तर वर्षभरापासून लॉकडाऊन आहे. संपर्काची साखळी तोडणे हाच कोरोनावरचा उपाय आहे. आपल्याला काही गोष्टी पाळाव्याच लागतील. आता ही बंधनं पुन्हा आपल्याला पाळावी लागणार आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, औरंगाबादबरोबर विदर्भातील नागपूर, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांमध्येही करोनाने डोके वर काढले आहे. इतर जिल्ह्यातही रुग्णांची संख्या वाढताना दिसत असून, राज्य सरकारकडून नागरिकांना सूचनांचे पालन करण्याचे व खबरदारी घेण्याचे आवाहन केले जाते आहे.