Nawab Malik (Photo Credits: ANI)

सध्या महाराष्ट्रात मोठी राजकीय खळबळ माजली आहे. मुंबई जवळील क्रुजवर ड्रग प्रकरणी आर्यन खानला (Aryan Khaan) एनसीबीने (NCB) अटक केल्यानंतर महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबी, समीर वानखेडे आणि भाजपवर आरोप करायला सुरवात केली. त्यानंतर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राज्यातील भाजपसेना मलिक यांच्यासमोर उभी राहिली. आता माहिती मिळत आहे की, राज्य सरकारही नवाब मलिक यांच्या पाठीही आहे.

विरोधी पक्ष भाजपने म्हटले होते की, मलिक हे महाविकास आघाडी सरकारच्या कोणत्याही पाठिंब्याशिवाय ‘एकाकी लढाई’ लढत आहेत. त्यावर मंत्री नवाब मलिक यांनी गुरुवारी या आरोपांचे खंडन केले. ‘मी एकटा नाही... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सर्व मंत्री, सरकार आणि पक्ष माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत,’ मलिक यांनी पत्रकारांना सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाने नवाब मलिक यांच्या सहा आठवड्यांच्या युद्धाचे कौतुक केल्यानंतर, मलिक यांचे हे विधान समोर आले आहे. गेले काही दिवस मलिक हे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे, भाजप नेते आणि संबंधितांच्या कथित कृत्यांचा पर्दाफाश करत आहेत. नवाब मलिक म्हणाले, 'ही लढाई अन्यायाच्या विरुद्ध आहे. सध्या ती मी एकटा लढू शकतो.. पण मला सर्व प्रमुख नेत्यांचा पूर्ण पाठिंबा आणि आशीर्वाद आहे ज्यामुळे मला ताकद मिळते. मी काही गोष्टी साफ करण्याची जबाबदारी घेतली आहे आणि पुढेही करत राहीन.'

गेल्या सहा आठवड्यात मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. याशिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही मलिक यांनी अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. कुर्ल्यातील मलिका यांच्या जमिनीच्या जुन्या व्यवहाराबद्दल माहिती देत फडणवीस यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले, ज्याचा त्यांनी दावा केला होता त्यांचे अंडरवर्ल्डशी व्यावसायिक संबंध आहेत. (हेही वाचा: Amruta Fadnavis यांची नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस, 'माफी मागा नाहीतर कारवाईला सामोरे जा')

दरम्यान, भारतीय जनता पक्षाने कालपासून नवाब मलिक यांच्या विरोधात आंदोलने सुरू केली आहेत. त्यांचे पुतळे जाळले जात आहेत. याबाबत विचारलं असता, माझे कितीही पुतळे जाळले तरी मी त्यांना आरसा दाखवत राहणार.