शिवसनेकडून पाठिंब्यासाठी प्रस्ताव आल्यास सत्तास्थापनेसाठी पाठिंबा द्यावा; खा. हुसेन दलवाई यांचे सोनिया गांधींना पत्र
Hussein Dalwai (PC - Twitter)

सत्तास्थापनेसाठी शिवसनेकडून पाठिंब्यासाठी प्रस्ताव आल्यास शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा द्यावा, अशी विनंती करणारे पत्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई (Hussein Dalwai) यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पाठवले आहे. दरम्यान दलवाई यांनी सोनिया गांधी यांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीदरम्यान शिवसेनेने प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता याचीदेखील आठवण करून दिली आहे. परंतु, शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. दलवाई यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली. भाजप पक्षाला सत्तास्थापनेपासून थांबवण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देणं गरजेचं आहे. काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर हे सरकार 5 वर्षे टिकले पाहिजे. पंरतु, सध्या काँग्रेस पक्षात शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून दोन गट पडल्याचे पाहायला मिळते.

हेही वाचा - महाराष्ट्रात शिवसेनेला कॉंग्रेस मदत करण्याबाबत निर्णय अजूनही गुलदस्त्यात; सोनिया गांधींसोबत केवळ राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली: बाळासाहेब थोरात

राज्यातील पक्षाचे प्रभारी मल्लीकार्जून खरगे, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याला विरोध केला आहे. तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्राप्त राजकीय परिस्थितीत आपण भूमिका घेतली पाहिजे, असं म्हटलं आहे. याला पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह अन्य नेत्यांनी समर्थन दिले आहे.

शिवसेनेने मुस्लिम आमदार साबिर शेख यांना मंत्रीपद दिले. मात्र, भाजपने एकाही मुस्लीम आमदाराला उमेदवारी दिली नाही. राज्यात भाजपची सत्ता आली तर काँग्रेस पक्षाला मोठे नुकसान होईल. त्यामुळे पक्ष टिकवण्यासाठी योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे, असंही दलवाई म्हणाले. शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की, नाही यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी सोनिया गांधींशी महाराष्ट्रातील निवडणूकपूर्व आणि निवडणुकीनंतरच्या परिस्थितीवर चर्चा केली. परंतु, सत्तास्थापनेसाठी शिवसेनेसोबत जायचे की नाही? याबाबत बोलण्यास काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नकार दिला. त्यामुळे काँग्रेस शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.