Jitendra Awhad | (Photo Credits: Facebook)

राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे कोविड-19 (COVID-19) विषाणूवर मात करुन ठणठणीत बरे झाले आहेत. उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने आणि बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) मिळाला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:च ही माहिती दिली आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर आव्हाड यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांचे प्रयत्न आणि मनातील सकारात्मक इच्छाशक्ती याच्या जोरावर आव्हाड यांनी कोरोनावर मात केली आणि घरी परतले.

रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर आव्हाड यांनी आपल्या @Awhadspeaks या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करत म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी देत असलेल्या माझ्या लढाईस यश आलेलं असून मी आज सुखरूप घरी जात आहे. यापुढे ही तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असंच राहू द्या. परत एकदा त्याच उत्साहात आणि त्याच जोमात पुरोगामी महाराष्ट्रासाठी पुन्हा लढण्यास सज्ज होऊया. (हेही वाचा, Coronavirus: महाराष्ट्र पोलीस दलातील 786 कर्मचारी COVID-19 पॉझिटीव्ह; 88 अधिकाऱ्यांसह 698 पोलिसांचा समावेश)

आव्हाड ट्विट

दरम्यान, आव्हाड यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून रुग्णालयातील कर्मचारी, डॉक्टर, नर्स आणि इतरांचे आभार मानले आहेत. या आभारात आव्हाड यांनी म्हटले आहे की, ''माझ्यावर यशस्वी उपचार करणारे फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथील सर्व डॉक्टर्स ,नर्सेस ,वॉर्डबॉय आणि इतर सर्व हॉस्पिटल स्टाफ यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन त्यांना मनापासून धन्यवाद. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझी पत्नी आणि मुलगी यांच्या प्रेमाची ताकद माझ्या पाठीशी होती''.

आव्हाड ट्विट

दरम्यान, आव्हाड यांनी एका ट्विटमध्ये एक हिंदी कविता शेअर केली आहे. ''महिन्याभरानंतर मी आपल्या सर्वांमध्ये आणि सर्वांसाठी पुन्हा असेल. असे म्हणत ''अपने कदमों के काबिलियत पर विश्वास करता हूं , कितनी बार तूटा लेकीन अपनो के लिये जीता हूं..''अशी एक कविताही त्यांनी शेअर केली आहे.

प्राप्त माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील एक पत्रकार, कॅमेरामॅन, तीन पोलीस शिपाई आणि राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त होते. हे सर्व मंत्री आणि पत्रकार आव्हाड यांच्या संपर्कात आले होते. दरम्यान, आव्हाड यांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या वारंवार येत होत्या. आव्हाडांनी त्याचे अनेकदा खंडणही केले होते. एकदा तर आव्हाड यांनी आपला मेडीकल रिपोर्टच ट्विटरव शेअर केला होता.