BJP | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणूकांच्या मतदानासाठी काही तास उरले असताना आज विरारच्या एका हॉटेलमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये गोंधळ घातला आहे. यानंतर राड्यानंतर काही वेळातच डहाणू विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सुरेश पाडवी (Dahanu BVA candidate Suresh Padvi) यांनी भाजप मध्ये प्रवेश करत भाजपाचे उमेदवार विनोद मेढा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराचा ऐन वेळी घेतलेल्या निर्णयामुळे अनेक चर्चांना ऊत आला आहे. निवडणुकीत मतं खाण्यापेक्षा योग्य उमेदवाराला मते मिळावी यासाठी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया सुरेश पाडवी यांनी दिली आहे.

डहाणू मध्ये विद्यमान आमदार विनोद निकोले आणि भाजपचे विनोद मेढा यांच्यामध्ये लढत होणार आहे. यांच्यासोबतच एकूण आठ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. सुरेश पाडवी यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश करत भाजपला पाठिंबा दिला आहे. (हेही वाचा: विरारमध्ये राडा; विनोद तावडे यांना पैसे वाटताना घेरले; दोन डायऱ्याही सापडल्या; बविआ कार्यकर्त्यांकडून रंगेहात पकडल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल).

विरार मध्ये राडा

विरार पूर्वे मध्ये मनवेलपाडा भागात विवांता हॉटेलमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे आले होते. ते हॉटेलमध्ये महिलांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. त्यानंतर भाजप आणि बविआ कार्यकर्ते आपापसात भिडले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आमदार क्षितीज ठाकूर देखील हॉटेलमध्ये आले त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आणि स्थिती हळूहळू नियंत्रणात आली.

दरम्यान आचारसंहिता भंग प्रकरणी विनोद तावडे आणि भाजपा उमेदवार विनोद मेढा यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.