मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कारवाई करत चार जणांना अटक केली आहे. या चौंघावर नियमबाह्य आणि विनापरवाना घोडागाडी शर्यत (Horse Carriages ) आयोजित केल्याचा आरोप आहे. मुंबईच्या रस्त्यांवर आगोदरच मोठ्या प्रमाणावर रहदारी असताना या चौघांनी गोरेगाव ते मुलुंड लिंक रोडवर घोडागाडी शर्यतीचे आयोजन कल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या चौघांवरही गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली आहे. एका बिगर सेवाभावी संस्थेकडून (NGO) तक्रार प्राप्त झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी ही करावाई केली.
दिंडोशी पोलिसांनी माहिती देताना सांगिले की, एका एनजीओकडून दिंडोशी पोलीस स्टेशनकडे तक्रार आली की, काही लोकांनी गोरेगाव ते मुलुंड लिंक रोडवर घोडागाडीचे आयोजन केले आहे. त्यांच्याकडे यासंदर्भात कोणताही परवाना नाही. असे असतानाही या लोकांनी पश्चिम उपनगरांमध्ये गोरेगाव परिसरात घोडागाडी शर्यतीचे रविवारी आयोजन केले.
एनजीओच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे दावा केला की, ते जेव्हा घटनास्थळावर गेले तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणावर लोकांचा समूह होता. तसेच, दोन घोडे घेऊन ते शर्यतीचे आयोजन आणि व्यवस्थापन करत होते. तसेच प्राण्यांच्या सुरक्षिततेची कोणतीही खबरदारी न घेता घोडागाड्या रस्त्याच्या मधोमध चालवत होते.
दिंडोशी पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन चौघांविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. रसेल जसिंटो, लॅरी जसिंटो, भास्कर वैश आणि दिलीप डाकवा अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.