मुंबई मध्ये घाटकोपर येथे झालेल्या दोन दिवसांपूर्वीच्या दुर्घटनेनंतर आता अन्य महानगर पालिका देखील खडबडून झाल्या आहेत. पुण्यात आयुक्तांनी 7 दिवसांत धोकादायक होर्डिंग काढण्याचे आदेश दिले आहेत. स्ट्रक्चरल ऑडिटची प्रमाणपत्र घेऊन जमणार नाही आता पालिका अधिकार्यांनी प्रत्यक्ष जाऊन धोकादायक होर्डिंग हटवावीत असं म्हटलं आहे. अधिकृत होर्डिंग मध्ये परवानगी न घेता बदल करणं, होर्डिंग साठी झाडं तोडणं, गॅलरी, खिडक्या बंद करून होर्डिंग लावणं यावर लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पुण्यात अधिकार्यांना सज्जड दम भरला आहे.
दरम्यान मुंबई मध्ये पंतनगर भागात दोन दिवसांपूर्वी BPCL पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून मोठा अपघात झाला आहे. यामध्ये 16 पेक्षा अधिक लोकांचा निष्पाप जीव गेला आहे. वादळी वारा आणि पावसामध्ये हे होर्डींग अचानक कोसळलं आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. यावरून आता अन्य महापालिकांनी अनधिकृत होर्डिंगची तपासणी सुरू केली आहे. पुण्यात 2598 अधिकृत होर्डिंग्स आहेत. पण त्यामधील नियमबाह्य होर्डिंग वर आता कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारकडून 2022 मध्ये होर्डिंग लावण्याबाबत नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने होर्डिंग कसे उभारावे, कोणत्या ठिकाणी उभारावे कुठे उभारू नये, दोन होर्डिंगमध्ये तीन फुटापेक्षा कमी अंतर नसावे, एकावर एक दोन होर्डिंग असू नयेत यासह अनेक नियम वा अटींचा समावेश आहे, पण सध्या सारेच नियम धाब्यावर बसवून काही जण होर्डिंग लावत आहेत.
पुण्यात अधिकृत 2598 पैकी 2249 होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे. पण त्यामध्ये किती सुरक्षित आहेत हा प्रश्न अनुत्तरित आहे. स्ट्रक्चरल ऑडिटच्या प्रमाणपत्रावर केवळ अवलंबून न राहता तुम्हाला जेथे होर्डिंगमुळे नागरिकांच्या जीवाला धोका आहे असे वाटते त्यावर कारवाई करा, पुढील सात दिवसात असे होर्डिंग निघाले पाहिजेत असे आदेश पुणे आयुक्तांनी दिले आहेत.