हिंगोली येथे कावड यात्रेत नंगी तलवार फिरवल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली पोलिसांनी ही कारवाई केली. आमदार बांगर यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यात आता आणखी एकाची भर पडली आहे. कधी शिवीगाळ, कधी दमदाटी तर कधी व्हायरल फोन कॉलमुळे यांमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. आता तर त्यांनी सार्वजिनक ठिकाणी धारधार तलवार फिरविल्याने गुन्हा दाखल झाला आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची हिंगोली येथे नुकतीच एक जाहीर सभा पार पडली. या सभेला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यामुळे या सभेला प्रत्युत्तर देणे भाग होते. त्यातूनच आमदार संतोष बांगर यांनी कावड यात्रा आयोजित केली असावी, असे बोलले जात आहे. दरम्यान, आमदार बांगर यांच्या वतीने काढण्यात आलेल्या कावड यात्रेदरम्यान त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्याचा सत्कार केला. या वेळ त्यांना शाल, श्रीफळ सोबतच एक तलवारही भेट म्हणून देण्यात आली. या वेळी ती तलावर बांगर यांनी म्यानातून बाहेर काढली आणि उचावली, हवेत फिरवली.
आमदार बांगर यांनी नंगी तलवार हवेत उंचावल्याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. त्यावरुन कारवाई करत पोलिसांनी कळमनुरी बोलीस ठाण्यात शस्त्रास्त्र कायद्यातील विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय विनापरवाना डिजे लावणे, गर्दी जमा करणे असेही काही इतर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहे. सोबतच डीजे मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार बांगर यांची भाषा नेहमीच शिवराळ राहिली आहे. त्यातूनच त्यांनी अनेकदा सरकारी कर्मचारी, कार्यकर्ते यांना शिवीगाळ केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियातून वेळोवेळी व्हायरल झाले आहेत. विधिमंडळातही त्यांचा सुरक्षा रक्षकांशी वाद झाल्याचे अनेकांनी पाहिले आहे. त्याबाबतच्या बातम्याही प्रसारमाध्यमांतून अनेकदा आल्याचे पाहायला मिळाले आहे. आता आमदार बांगर यांच्यावरील कारवाई पुढे कशी सुरु राहते याबाबत हिंगोलीच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.