Representational Image (Photo Credits: Facebook)

हिंगणघाट प्रकरणातील (Wardha Hinganghat Teacher Burnt Case) आरोपी विकेश नगराळेची (Viky Nagrale) न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) रवानगी करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजता विकेशला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायाधीश रत्नमाला डफरे यांनी विकेशला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची वर्धा कारगृहात रवानगी करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी गुप्तता पाळत आरोपीला न्यायालयात हजर केले.

विकेशला याअगोदर चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. 3 फेब्रुवारी रोजी हिंगणघाट येथे 30 वर्षीय प्राध्यापिकेला आरोपी विकेशने पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. यात पीडित महिला 20 ते 30 टक्के भाजली होती. सध्या पीडित तरुणीची प्रकृती चिंताजनक आहे. तिच्यावर नागपूरमधील ऑरेंजसिटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (हेही वाचा - कर्नाटक विधानसभा निवडणूक आचारसंहिता भंग प्रकरण: बेळगाव कोर्टाकडून संभाजी भिडे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी)

दरम्यान, पीडित तरुणीच्या शरिरात इन्फेक्शन होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. यासाठी या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालणार आहे. तसेच ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम पीडितेची बाजू मांडणार आहेत.