मुंबई: 2007 च्या घरगुती गॅस सिलेंडर स्फोट प्रकरणी 'हिंदुस्थान पेट्रोलियम' ला 10 लाखांचा दंड
Image For Reprsentation (Photo Credit : ANI)

2007 साली कल्याण (Kalyan) येथे एका घरगुती गॅस सिलेंडरचा (Gas Cylinder Explosion) स्फोट होऊन भारती निमसे (Bharti Nimse) या महिलेचा मृत्यू झाला होता.या प्रकरणी तब्बल 11 वर्षांनी राज्य ग्राहक आयोगाने निर्णय दिला आहे. या सिलेंडरमध्ये सदोष व्हॉल्व्ह पिन असल्याने या अपघातासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (HPCL) ला दोषी ठरवण्यात आले आहे, तसेच या स्फोटात मृत्यू झालेल्या महिलेच्या दोन मुलांना 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश आयोगाने कंपनीला दिले आहेत. व्हॉल्व्ह पिन ही सदोष असल्याने गॅस सिलिंडर ग्राहकाला देऊन कंपनीने निकृष्ट सेवा दिली आणि त्यामुळेच या अपघाताला कंपनी पूर्णपणे जबाबदार असल्याचे राज्य ग्राहक आयोगाने निकालात म्हंटले आहे. (मुंबई: रस्त्यावरील एक खड्डा बुजवण्यासाठी 17 हजार रुपयांचा खर्च, माहिती अधिकारात उघड)

प्राप्त माहितीनुसार, भारती निमसे या पतीच्या निधनानंतर त्या आपल्या दोन मुलांच्या समवेत कल्याण मध्य राहत होत्या. 6 एप्रिल 2007 रोजी भारती या शेगडीला नवीन गॅस सिलिंडर जोडत असताना भरलेल्या सिलिंडरमधून गॅसगळती होऊ लागली. हा वायू देवाऱ्यातील दिव्याच्या संपर्कात आल्याने स्फोट झाला. यानंतर भारती यांच्या भावाने दोन मुलांच्या वतीने कंपनी विरोधात जिल्हा ग्राहक न्यायालयात भरपाईची मागणी केली होती. याबाबत जिल्हा ग्राहक मंचाने 2015 मध्ये तक्रार योग्य ठरवत त्यांच्या दोन्ही मुलांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश कंपनीला दिले होते. मात्र कंपनीने या निर्णयाच्या विरोधात 2016 मध्ये ग्राहक आयोगात अपील दाखल केले. या अपघाताला पूर्णतः भारती याच जबाबदार होत्या, असा दावा केला.

निमसे यांच्याकडील गॅस हा रबराच्या पाईपने सिलिंडरला जोडलेला होता. परंतु हा पाईप आणि त्याचे रेग्युलेटर हे मान्यता प्राप्त व प्रमाणित नव्हते. त्यामुळेच सिलिंडरचे झाकण काढताच दिव्यामुळे सिलिंडरचा स्फोट झाला असा दावा कंपनीने केला होता.

दरम्यान, कल्याण अग्निशमन दलातील अधिकाऱ्याने सादर केलेल्या अहवालानुसार, व्हॉल्व्ह पिन सदोष असल्याने गॅस गळती झाली असे समोर आले आहे तसेच रबरी पाइपद्वारे सिलिंडर गॅसला जोडण्यापूर्वीच गळती झाली आणि स्फोट झाला. या अहवालाच्या आधारे जिल्हा ग्राहक मंचाने दिलेला निकाल योग्य होता, यावर आयोगाने शिक्कामोर्तब केला आहे.