
काही दिवसांपूर्वी कर्नाटकमधील हिजाब वाद (Karnataka Hijab Controversy) देशभरात चर्चेत आला होता. अनेकांनी त्याला विरोध केला तर अनेकांनी पाठिंबा दर्शवला. सध्या हे प्रकरण बऱ्याच अंशी शांत झाल्याचे दिसते. मात्र, महाराष्ट्रातील औरंगाबाद (Aurangabad) शहरात या प्रकरणाने जोर पकडल्याचे दिसत आहे. वंचित बहुजन आघाडीकडून हिजाब वादामधील मुस्कान खानचा (Muskan Khan) सत्कार होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. व्हीबीएच्या पदाधिकाऱ्यांनी ही घोषणा केल्यापासून शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी याला विरोध दर्शवण्यास सुरुवात केला आहे.
हा सत्कार सोहळा होऊ नये, यासाठी पोलीस आयुक्तांना पत्रही देण्यात आले आहे. अशा स्थितीत वंचित बहुजन आघाडी आणि भाजप आमनेसामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्नाटकची हिजाब गर्ल मुस्कान खान हिचा 14 मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. मुस्कानचा सत्कार झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजप शहराध्यक्षांनी दिला आहे.
कर्नाटकातील एका महाविद्यालयात हिजाब घालून प्रवेश करत असताना काही मुलांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या होत्या. यानंतर या मुलांना प्रत्युत्तर देताना मुस्कान खानने अल्लाहू अकबरच्या घोषणा दिल्या होत्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यानंतर देशभरातून अनेक प्रतिक्रिया आल्या. वाढता वाद पाहून कर्नाटक सरकारने शाळा बंद केल्या होत्या. पालकांनीही मुलांना शाळेत पाठवणे बंद केले होते. हे प्रकरण कर्नाटकात शांत झाले असले तरी महाराष्ट्रात मात्र ते तापले आहे. (हेही वाचा: Aurangabad: कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाच मॉल्स, सरकारी कार्यालये, दारूची दुकाने, पेट्रोल पंपावर मिळणार 'त्वरित' सुविधा)
दरम्यान, कर्नाटकातील एका कॉलेजपासून सुरू झालेला हिजाबचा वाद मुंबईपर्यंत पोहोचला होता. मायानगरीतील एका महाविद्यालयातही असेच नियम व अटी लागू करण्यात आल्या होत्या. याठिकाणी महिलांना हिजाब, स्कार्फ किंवा चेहरा झाकण्याची परवानगी नव्हती. या वादानंतर मुंबई शहरातही कॉलेज प्रशासनाविरुद्ध निषेधाचे आवाज उठू लागले होते.