High Tide In Mumbai Coast | (Photo Credits: ANI)

मुंबई (Mumbai), मुंबई उपनगर आणि कोकण (Konkan) तसेच तळकोकण भागात अतिवृष्टी होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढचे काही तास (48) ही स्थिती कायम राहिल असाही इशारा आयएमडीने दिला आहे. दरम्यान, या काळात समुद्रात भरती आल्याने किनारपट्टीवर उंचच उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. आज (शनिवार, 4 जुलै 2020) सकाळी 11.38 वाजता मुंबई समुद्र किनारपट्टीवर सुमारे 4.57 मीटर उंचीइतक्या लाटा उसळतील असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

दरम्यान, अतिवृष्टी आणि समुद्र भरतीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने नागरिकांना सतर्कतेच्या सुचना दिल्या आहेत. भरती काळात नागरिकांनी समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये. अत्यावश्यक सेवेसाठी पालिकेशी संपर्क करावा असेही पालिकेने म्हटले आहे. हवामान विभागाने 3 आणि 4 जुलै या दिवशी मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणात मुसळधार ते अतिवृष्टी अशा स्वरुपाचा पाऊस कोसळे असा अंदाज वर्तवला होता. या पावसावेळी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असेही हवामान विभागाने म्हटले आहे. (हेही वाचा, Monsoon 2020 Update In Mumbai: मुंबईत येत्या 48 तासात जोरदार पावसाची शक्यता, उद्या High Tide सुद्धा होणार, जाणून घ्या वेळ)

दरम्यान, आज सकाळपासूनच मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर आणि कोकणातील विविध जिल्ह्यांसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे हवामना विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरताना दिसत आहे.