Pune Helicopter Crash | (Photo Credits: Latestly Text)

पुणे जिल्ह्यातील पौड (Paud) परिसरात एक हेलिकॉप्टर कोसळले (Helicopter Crash Pune) आहे. ही घटना आज (शनिवार, 24 ऑगस्ट) दुपारी 3 वाजणेच्या सुमारास घडली. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह एकूण चार लोक असल्याची प्राथमिक माहिती आहे. खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडली असावी, असे सांगितले जात आहे. हेलिकॉप्टर नेमके कोणत्या कंपनीचे आहे. त्यात किती आणि कोण व्यक्ती होत्या. याबाबत कोणतीही माहिती अद्याप पुढे आली नाही. मात्र, ही घटना घडली तो भाग अतिपर्जन्यवृष्टीचा परिसर म्हणून ओळखला जातो. आज पुणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे या अपघातास पाऊस आणि खराब हवामान कारणीभूत ठरले असावे, असा प्राथमिक तर्क काढला जातो आहे.

पायलट सुरक्षीत असल्याची प्राथमिक माहिती

हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात आली असून, प्रशासन घटनास्थळी दाखल होण्याची प्रतिक्षा आहे. काही स्थानिक नागरिकांनी हेलिकॉप्टर कोसळताना प्रत्यक्ष पाहिले. हेलिकॉप्टर कोसळल्यामुळे मोठा आवाज झाला. आवाजाच्या दिशेने स्थानिक नागरिक धावले असता त्यांना कोसळलेल्या हेलिकॉप्टरचा सांगाडा पहायला मिळाला. दरम्यान, हेलिकॉप्टरमधून पायलट बाहेर आल्याचे पाहिले. त्यांनी पालयट आणि पीडितांना मदत आणि बचावकार्य पुरवले. दरम्यान, हेलिकॉप्टरमधून बाहेर आल्यानंतर पायलट कोणत्याही स्थिती बोलण्याच्या मनस्थितीत नाही. तो प्रचंड घाबरला असून, कोणही नागरिकांनी हेलिकॉप्टरजवळ जाऊ नये, असे सांगत असल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने खासगी वृत्तवाहीनीशी बोलताना सांगितले. (हेही वाचा, Indian Army Cheetah Helicopter Crashed: भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, अरुणाचल प्रदेश राज्यातील मंडला हिल्स परिसरातील घटना)

स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल

दरम्यान, एका खासगी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. थोड्याच वेळात हेलिकॉप्टर कोणत्या कंपनीचे होते, ते कोणत्या कारणास्तव या प्रदेशात भ्रमंती करत होते याबाबत माहिती मिळू शकणार आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही या जिल्ह्यात अशाच प्रकारे हेलिकॉप्टर कोसळण्याची घटना घडली होती. एक प्रशिक्षणार्थी पायलट हेलिकॉप्टर चालवत असताना ही घटना घडली होती.

पौड येथे हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना (Video)

पुणे जिल्ह्यात हवाई उड्डाण प्रशिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर येत असतात. त्यांचा नियमीतपणे सरावही सुरु असतो. हा सराव सुरु असताना प्रशासन आणि संबंधित प्रशिक्षण संस्थेकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जाते. मात्र, तरीही अनेकदा अप्रिय घटना घडात. या घटनांमध्ये अनेकदा मानवी चुका असतात तर कधी तांत्रिक. काही प्रकरणांमध्ये मानवी अथवा तांत्रिक चूक नसली तरी हवामाना झालेल्या अचानक बदलामुळेही अपघाताच्या घटना घडतात. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी अधिक खबरदारी घेण्यात यावी अशी सूचना या क्षेत्रातील जाणकार करता.