Indian Army Cheetah Helicopter Crashed: भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, अरुणाचल प्रदेश राज्यातील मंडला हिल्स परिसरातील घटना
Indian Army Helicopter | (File Image)

भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले (Indian Army Cheetah Helicopter Crashed) आहे. हे हेलिकॉप्टर (Helicopter) अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) राज्यातील मंडला हिल्स (Mandala Hills) प्रदेशातील डोंगराळ भागात कोसळले. हेलिकॉप्टर कोसळताच मदत आणि बचाव कार्य सुरु झाले आहे. दरम्यान, पायलट बेपत्ता आहे. त्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशातील बोमडिलाच्या पश्चिमेला आज सकाळी भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले. आज सकाळी 9.15 च्या सुमारास हेलिकॉप्टरचा एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) शी संपर्क तुटला. या घटनेनंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 5 ऑक्टोबर 2022 रोजी अरुणाचल प्रदेशमध्ये लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते. तवांग परिसरात झालेल्या अपघातात पायलटचा मृत्यू झाला होता. तर दुसरा पायलट गंभीर जखमी झाला. हे हेलिकॉप्टर तवांगमधील चीनच्या सीमेजवळील फॉरवर्ड भागात नियमित उड्डाण करत होते.

ट्विट

भारतीय लष्कर वापरत असलेले चीत्ता हेलिकॉप्टर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कंपनीने उत्पादीत केले आहे. चित्ता हे एक अष्टपैलू हेलिकॉप्टर आहे. ज्याचा उपयोग सैन्याला रसद पुरवठा, टेहेळणी, अपघातग्रस्तांना बाहेर काढणे आणि दळणवळण यासारख्या विविध कामासाठी केला जातो. चित्ता हेलिकॉप्टरला एकच इंजिन असून ते पायलटसह सहा प्रवासी वाहून नेऊ शकते. त्याचा कमाल वेग 185 किमी/तास आहे.

भारतीय लष्कर अनेक दशकांपासून चित्ता हेलिकॉप्टर वापरत आहे. या हेलिकॉप्टरचा मोठा ताफा सेवेत आहे. चित्ता हे भारतीय लष्कराच्या ऑपरेशनल गरजांसाठी एक विश्वासार्ह आणि प्रभावी साधन असल्याचे सिद्ध झाले आहे. तथापि, भारतीय लष्कर आता चीता हेलिकॉप्टर टप्प्याटप्प्याने काढून टाकण्याच्या आणि त्याऐवजी नवीन आणि अधिक प्रगत हेलिकॉप्टर घेण्याच्या प्रक्रियेत आहे.