Heavy Rains in Maharashtra | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

वाढता उन्हाळा. उकाडा आणि घामाच्या धारा. त्यात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन (Lockdown) यामुळे हैराण झालेल्या जनतेला वरूनराजाने काहीसा दिलासा दिला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस (Heavy Rains) पडला आहे. राज्यातील काही ठिकाणी हलका, मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने आगोदरच व्यक्त केली होती. दरम्यान, खरोखरच पाऊस पडल्याने हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आहे. राज्यातील कोल्हापूर (Kolhapur), सातारा (Satara), सांगली (Sangli), पालघर (Palghar) आणि कोकणसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात बुधवारी (दि.29) तुरळक पाऊस पडेल असे हवामान विभागाने म्हटले होते. हवामान विभागाने हा अंदाज मंगळवारी (दि.28) व्यक्त केला होता. राज्यातील अनेक ठिकाणी तापमानात वाढ होईल. तर काही ठिकाणी दुपारनंतर हवामान ढगाळ होऊन पावसाच्या सरी बरसतील असे हवामान विभागाने म्हटले होते.

दरम्यान, आज दुपारनंतर राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पावसाने दमदार हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी घराचे छप्पर, पत्रे उडाले. झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी विजांचा कडकडाट झाला. (हेही वाचा, Buldhana Bhendwal Bhavishyavani: यंदाची भेंडवळ भविष्यवाणी जाहीर; जाणून घ्या पाऊस, पीक पाणी ते राजकीय, आर्थिक संकटाचे काय आहेत अंदाज?)

अवकाळी पावसामुळे उकाड्याने आणि उन्हाने हैराण झालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळाला. मात्र, शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. कोरोना व्हायरस संकटामुळे लॉकडाऊन आहे. अशा स्थितीत वाहतूक यंत्रणा ठप्प आणि कामासाठी मजूरांची अनुपप्लब्धता आदी कारणांमुळे शेतकऱ्याचा शेतमाल शेतातच आहे. प्रामुख्याने द्राक्षं, कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांचा शेतमाल झाडांवरच आहे. त्यामुळे या मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले.