गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र मान्सूनच्या प्रतिक्षेत होता. आजच मान्सूनने कोकणात हजेरी लावली. तर लवकरच तो राज्यभरात बरसेल असाही अंदाज वर्तवण्यात आला. मात्र आज संध्याकाळी साताऱ्यातील विखळे-कलेढोण गावात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने जागोजागी पाणी साचले. यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. (दक्षिण कोकणमध्ये मान्सून दाखल, पुढील 3 ते 4 दिवसांत मुंबईसह उर्वरीत महाराष्ट्रात पोहोचणार)
एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, साताऱ्याच्या माणखटाव भागात गेल्या दोन वर्षांपासून पाऊस न झालेली अनेक गावे आहेत. अशाच भागात हे विखळे-कलेढोण गाव आहे. पाऊसाची सवय नसल्याचे पाऊसापूर्वी घेण्यात येणारी सुरक्षिततेची खबरदारी येथील नागरिकांकडून घेण्यात आलेली नव्हती. त्यामुळे अचानक झालेल्या जोरदार पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तसंच अनेकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसानही झालं आहे.
माणखटाव हा भाग दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात असल्याने या ठिकाणी पाणी साठवण्याची सोय केली असल्यास या पावसाचा नक्कीच गावाला फायदा होईल. अचानक झालेल्या पावसाने मात्र रस्त्यावर पाणी साचलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.