पुणे: PUBG Game खेळताना ह्दयविकाराचा झटका; पिंपरी-चिंचवड येथील 25 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
PUBG (Photo Credits: PUBG)

अविश्रांतपणे पबजी गेम (PUBG Game) सातत्याने खेळत राहणे हर्षल मेमाणे (Harshal Memane) नावाच्या एका 25 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतले आहे. पबजी गेम खेळताना या तरुणाला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान हर्षल याचा मृत्यू झाला. ही घटना पुणे (Pune) शहरानजीक असलेल्या पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथे घडली. देहुरोड पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.

दरम्यान, देहुरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल देविदास मेमाणे असे या तरुणाचे संपूर्ण नाव आहे. तो पिंपरी-चिंचवड परिसरात असलेल्या रावेत येथे राहात होता. प्रदीर्घ काळापासून हर्षल हा बेकार होता. त्याच्या हाताला काम नव्हते. पबजी गेम खेळण्यात तो अकंट डुंबलेला असायचा. शुक्रवारीही (17 जानेवारी 2020) तो पबजी गेम खेळत होता. मात्र, गेम खेळता खेळता त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरु असतानाच आज (शनिवार, 18 जानेवारी 2020) त्याचा मृत्यू झाला. (हेही वाचा, PUBG Game Ban: पबजी खेळावर राजकोट- सुरत नंतर भावनगर आणि गिर सोमनाथ येथे बंदीची मागणी)

दरम्यान, बराच काळ हाताला काम नसल्याने बेकार असलेला हर्षल नेहमी ताणात असावा. त्यातच तो सातत्याने पबजी गेम खेळत राहिल्याने हा ताण वाढला असण्याची शक्यता असून,त्यातच त्याला हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता आहे. ज्यात त्याचा मृत्यू झाला असावा, असे हर्षल याच्या मृत्यूची माहिती पोलिसांना देताना डॉक्टरांनी सांगितले.