
महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य विभागात रखडलेली भरती प्रक्रिया (Health Department Maharashtra Recruitment) आता तीन वर्षांनी मार्गी लागण्याची चिन्हं आहे. नुकतेच राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून आरोग्य विभागातील गट क साठी भरतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार आता 15, 16 ऑक्टोबरला 'क' गटाच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. परीक्षेनंतर 15 दिवसांत निकालही जाहीर केला जाणार असल्याची माहिती राज्य सरकार कडून देण्यात आली आहे.
आरोग्य विभागात गट क च्या नोकरभरतीमध्ये आरोग्य सेवक ,आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या पाच पदासाठी नोकरभरती होणार आहे.मागील वर्षी 24 ऑक्टोबरला आरोग्य विभागाची गट क आणि गट ड वर्गासाठी परीक्षा झाली होती. त्यावेळी या परीक्षेत घोळ झाल्याचं निदर्शनास आल्याने पुढील सारी प्रक्रिया बारगळली होती. तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तेव्हा सारी भरती प्रक्रिया रद्द करून सरकार नव्याने परीक्षा घेईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार आता या परीक्षा नव्याने घेतल्या जाणार आहेत. नक्की वाचा: Government Job: महिला बाल विकास विभागात नोकरीची संधी, आजचं अर्ज करा .
आता नव्याने परीक्षेचा सारा कार्यक्रम बनवण्यात आला आहे. यामध्ये कोणत्या कंपनीकडून परीक्षा घेतली जाईल ते विद्यार्थ्यांची हॉल तिकीट्स, परीक्षा, परीक्षेनंतर उत्तरसूची जाहीर करणं, त्यामधील आक्षेप पाहणं आणि अंतिम निकाल लावणं याचा समावेश आहे. त्यासाठी दिलेल्या गाईडलाईन्स आणि वेळापत्रक तंतोतंत न पाळल्यास शिस्तभंगविषयक कारवाईचाही इशारा देण्यात आला आहे.