राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिलासा दिला आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या (Enforcement Directorate) प्रकरणांमध्ये हसन मुश्रीफ यांच्यावर पुढचे दोन आठवडे अटकेची कारवाई न करण्याचे निर्देशच कोर्टने दिले आहेत. दरम्यान, हसन मुश्रीफ यांनी आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यात यावा यासाठी केलेल्या याचिकेवरील सुनावणी मात्र कोर्टाने स्थगित केली आहे. त्यामुळे तूर्तास तरी मुश्रीफ यांना दोन आठवड्यांचा मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. याशिवाय कोर्टाने मुश्रीफ यांना अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयाकडे रितसर अर्ज करावा असेही म्हटले आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने हसन मुश्रीफ यांना दाखल विविध प्रकरणांमध्ये चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस पाठवले आहे. हे प्रकरण कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्याशी संबंधित आहे. कारखान्यांच्या विविध व्यवहारांमध्ये अनियमितता असल्याचा मुश्रीफांवर आरोप आहे. शिवाय, कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेतही काही आर्थिक उलाढाल बेकायदेशीररित्या केल्याचा मुश्रीफांवर आरोप झाला आहे. या प्रकरणात मुश्रीफ यांचा मुलगा सहभागी असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणांमध्ये चौकशी करण्यासाठी ईडीने मुश्रीफ यांना नोटीस पाठवली आहे. (हेही वाचा, Hasan Mushrif ED Raids: साखर कारखाना घोटाळा प्रकरणी हसन मुश्रीफ यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले)
दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूरातील कागल येथील घरी ईडीने नुकतीच छापेमारी केली. ही छापेमारी झाली तेव्हा हसन मुश्रीफ घरी नव्हते. त्यांच्या घरी छापेमारी होण्याची ही दुसरी वेळ होती. दरम्यान, वारंवार होत असेलली छापेमारी पाहून हसन मुश्रीफ यांचे कुटुंबीय उद्विग्न झाल्याचे पाहायला मिळाले. वारंवार येऊन धाडी टाकण्यापेक्षा एकदाच काय ते आम्हाला गोळ्या घाला आणि ठार मारा, अशी उद्विग्न भावना हसन मुश्रीफ यांच्या पत्नीने प्रसारमाध्यमांकडे व्यक्त केली होती.
ट्विट
Order
Petition is filed. No coercive action is sought...The petitioner to appraoch the trial court. We protect him for two weeks...We have not gone into the merits of the petition and all contentions are kept open. #BombayHighCourt
— Live Law (@LiveLawIndia) March 14, 2023
हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार आहेत. ते कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभेवर प्रतिनिधित्व करतात. मुश्रीफ हे पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख मुस्लिम चेहरा म्हणून ओळखले जातात. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा आहे. युती सरकारच्या काळात हसन मुश्रीफ यांची मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी कामगार मंत्रीपद भूषवले. मोदी लाटेत 2014 च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला. त्यांना भाजपने पक्षात येण्याची ऑफरही दिली होती, मात्र त्यांनी ही ऑफर धुडकावून लावली.