Harshvardhan Patil On BJP: भाजपमध्ये शांत झोप लागते.. कोणतीही चौकशी नाही, काही नाही.. त्यामुळे मी आनंदी- हर्षवर्धन पाटील (Video)
Harshvardhan Patil | (Photo Credits: Facebook)

एकेकाळी काँग्रेसचे (Congress) नेते असलेले माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी भारतीय जनता पक्षात (BJP) जाण्याचे कारण अप्रत्यक्षरित्या सांगितले आहे. तसेच, भाजप प्रवेशानंतर त्यांच्या असलेल्या भावनाही मोकळेपणाने व्यक्त केल्या आहे. भाजपमध्ये गेल्याने आता मला शांत झोप लागते आहे. कोणतीही चौकशी नाही काही नाही. त्यामुळे आनंदात आहे असे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले आहे. हर्षवर्धन पाटील यांनी एका कार्यक्रमात मिश्कीलपणे हे विधान केले असले तरी, त्यावरुन राज्याच्या राजकारणात चर्चा होणार हे नक्की. कारण, भाजप विरोधी पक्षाच्या नेत्यांवर चौकशीचा ससेमीरा लावत असल्याचा आरोप या आधीही करण्यात आला आहे. तो आता अधिक जोरदारपणे केला जाण्याची शक्यता आहे.

एका हॉटेलच्या उद्घाटन कार्यक्रमात जाहीर व्यासपीठावरुन हर्षवर्धन पाटील बोलत होते. या वेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपचे इतरही पदाधिकारी मंचावर होते. या वेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले ''आमदार साहेब म्हणाले मी आहे तिथे सुखी आहे. तुम्ही दिल्या घरी सुखी राहा. माऊली आमच्या शेजारी बसल्या आहेत. स्टेज गमतीशीर आहे. आता आम्हलाही भारतीय जनता पक्षात जावे लागले. ते म्हणाले का गेला? मी म्हणालो ते तुमच्या नेत्याला विचारा. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये का गेले? ते म्हणाले, तेवढं सोडून बोला. पण मी तुम्हाला सांगतो, काही नाही.... मस्त आहे निवांत आहे. भाजपमध्ये असल्याने शांत झोप लागते. काही चौकशी नाही काही नाही. मस्त वाटतंय''.  (हेही वाचा,BJP Mega Recruitment 2019: भाजप प्रवेशामुळे हर्षवर्धन पाटील, गणेश नाईक यांच्यासह दिग्गजांच्या हाती 'कमलपुष्प' )

व्हिडिओ

केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरुन भाजप राज्यातील आणि एकूण देशभरातीलच विरोधकांना लक्ष्य करत आहे, असा आरोप अनेकांनी या पूर्वीच केला आहे. महाराष्ट्राचा विचार करायचा तर राज्यातील काही भाजप नेते महाविकासआघाडी सरकारमधील नेते, मंत्री यांच्यावर आरोप करतात. त्यानंतर अल्पावधीत किंवा काहीच आठवड्यांमध्ये त्या नेत्यांच्या घर, कार्यालय अथवा कंपन्यांवर आयकर विभाग, सीबीआय आणि इतर केंद्रीय यंत्रणांच्या धाडी पडतात. देशभरातही असे चित्र अनेकदा दिसले आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या सत्यच सांगितले की काय? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.