Kannad Vidhan Sabha Election 2024 Result: कन्नड मतदारसंघातून शिवसेनेच्या शिंदे गटाच्या संजना जाधव (Sanjana Jadhav) यांचा विजय झाला असून त्यांनी त्यांचे पती हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांचा दारुण पराभव केला आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीमध्ये संजना जाधव या पहिल्या दिवसापासूनच प्रचाराच्या माध्यमातून आपली बाजू मांडत होत्या. अनेक वर्षापासून त्यांनी गावागावात जाऊन कामाचा झपाटा लावला होता. त्यांच्या कुटुंबातील कलहामुळे त्यांना वेळोवेळी संघर्ष करावा लागला.
संजना जाधव या माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या असून हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी आहेत. अनेक वर्षांपासून जाधव दाम्पत्यात मोठा कलह सुरू होता. त्यातूनच संजना जाधव ह्या राजकारणाच्या दिशेने वाटचाल करू लागल्या. घरात राजकीय बाळकडू मिळाल्याने त्यांनी राजकारणामध्ये चांगली प्रगती करण्यासाठी गावोगावी सामाजिक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला. (हेही वाचा -Ambegaon Assembly Election 2024 Result: शरद पवारांना धक्का! आंबेगाव मतदार संघातून दिलीप वळसे पाटील 1100 मतांनी विजयी)
संजना जाधव यांच्या विजयामध्ये सर्वसामान्य महिलांचा महत्त्वाचा वाटा आहे. प्रचारादरम्यान सांगता सभेला संबोधित करताना संजना जाधव यांना स्वतःची व्यथा सांगताना अश्रू अनावर झाले होते. त्यामुळे महिलांकडून त्यांना सहानुभूती मिळाली. (हेही वाचा -Shevgaon-Pathardi Vidhan Sabha Election 2024 Result: भाजप आमदार मोनिका राजळे यांना धक्का! शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले 4720 मतांनी आघाडीवर)
दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांनी यापूर्वी कन्नड मतदार संघातून विजय मिळवला होता. परंतु त्यांच्या स्वतःच्या पक्ष बदलाच्या कारणाने व स्वतःच्या भूमिकेवर ठाम न राहिल्याने जनतेने त्यांना नाकारलं, असं म्हटले तरी वावगं ठरणार नाही. कन्नड मतदासंघात संजना जाधव यांचा विजय अत्यंत महत्त्वाचा समजला जात आहे.