Hasan Mushrif | (File Image)

महाराष्ट्रातील कोविड-19 (Coronavirus) प्रकरणे कमी झाल्यानंतर आता ग्रामपंचायतींना ग्रामसभांचे (Gram Sabhas) आयोजन करण्यास परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी ही माहिती दिली. कोरोनाच्या घटनांमध्ये घट झाल्याने सरकारने गेल्या महिन्यात ग्रामसभा सुरू करण्यास परवानगी दिली होती, परंतु कोरोना विषाणूचे नवे रूप समोर आल्यानंतर खबरदारी म्हणून ही परवानगी मागे घेण्यात आली होती. आता सोशल डिस्टन्सिंग आणि कोविड-19  अनुषंगाने निर्गमित विविध मार्गदर्शक तत्वांचे पालन करून, राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन करण्यास पुन्हा संमती देण्यात आली आहे.

यावेळी मुश्रीफ म्हणाले, कोविड-19 मधील घटनांमध्ये घट झाली आहे आणि खेड्यांमध्ये परिस्थिती सामान्य होत आहे. हे विचारात घेऊन, साथीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून ग्रामसभा आयोजित करण्यास परवानगी देण्यात येत आहे. या संदर्भात आज एक परिपत्रक जारी करण्यात आले होते, असे निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 नुसार आर्थिक वर्षात किमान चार ग्रामसभा आयोजित करणे आवश्यक आहे. (हेही वाचा: यंदाची शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन; राज्य सरकारकडून मार्गदर्शन सूचना जारी)

ग्रामसभेच्या मंजूरीअभावी वार्षिक विकास आराखडे, शासनाच्या विविध योजनांतर्गत वैयक्तिक लाभार्थांची यादी, पुनर्वसित गावांचे प्रस्ताव, गौण खनिज परवानगी, थेट सरपंच विरुद्धातील अविश्वास प्रस्ताव, चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करणे इत्यादी बाबी प्रलंबित राहिलेल्या आहेत. आता सद्यस्थितीत कोविडच्या अनुषंगाने लॉकडाऊन काळातील निर्बंधांमध्ये शिथिलता येत असून बहुतांश जनजीवन पूर्ववत होत असल्याने ग्रामसभांच्या आयोजनास देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात येत आहे.