Shiv Jayanti 2021 Guidelines: यंदाची शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन; राज्य सरकारकडून मार्गदर्शन सूचना जारी
Shivaji Maharaj (Photo Credits: Wikimedia Commons)

कोविड-19 (Covid-19) संकटाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षातील सर्वच सण अगदी साधेपणाने साजरे करण्यात आले. आता कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असला तरी धोका कायम असल्याने शिवजयंतीचा (Shiv Jayanti) उत्सव देखील साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. गर्दी टाळण्यासाठी कार्यक्रम आणि मिरवणूका यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना राज्य सरकारच्या गृह विभागाकडून जारी करण्यात आल्या आहेत. (Shiv Jayanti 2021 Date: 19 फेब्रुवारी दिवशी साजरी होणार शिवजयंती 2021; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व)

अनेक संस्था, संघटनांकडून तसंच शासकीय पातळीवर तारखेनुसार 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी केली जाते. मात्र यंदा कोविड-19 संकटामुळे शिवजयंतीच्या उत्सवावर काही निर्बंध घालण्यात आले आहेत. शिवजयंती निमित्त जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

# शिवजयंती निमित्त 18 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12 वाजता शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती साजरी करतात. मात्र यंदा कोरोना सावटामुळे त्यावर बंदी घालण्यात आली आहे.

# शिवजयंती निमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमांवर देखील निर्बंध लादण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. अशा कार्यक्रमांचे केबल नेटवर्क किंवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.

# प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुकी काढू नयेत.

# शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला किंवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यासाठी आयोजित कार्यक्रम केवळ 10 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

# तसंच या कार्यक्रमादरम्यान कोरोना विषयक नियमांचे म्हणजेच मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टसिंग याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

# कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी लागू केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर नागरिक, शिवभक्त यांच्या सुरक्षेसाठी सरकारकडून नियम जारी करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सण सुरु होण्यापूर्वी अजून काही सूचना आल्यास त्याचे देखील पालन करणे बंधनकारक असणार आहे.