राज्यातील सुमारे 14 हजार 234 गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उद्या (शुक्रवार, 15 जानेवारी 2021) मतदान (Maharashtra Gram Panchayat Elections 2021) पार पडत आहे. तर त्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी म्हणजेच 18 जानेवारीला मतमोजणीही पार पडत आहे. ग्रामपंचायात निवडणुकीसाठी उडालेला प्रचाराचा धुरळा काल (13 जानेवारी) सायंकाळी संपला. त्यानंतर केवळ गाठीभेटी आणि छुप्या प्रचाराला गावागावांमध्ये जोर दिसत आहे. मतदानासाठी (Gram Panchayat Elections) आवघे काही तासच बाकी असल्याने उमेदवार आणि नेते डावपेचांवर भर देताना दिसत आहेत.
गडचिरोली, गोंदिया वगळता सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत मतदान
ग्रामपंचायात निवडणूक मतदान प्रक्रियेसाठी मतदानयंत्र गावोगावी रवाना झाली आहेत. दरम्यान, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पार पडत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदानाची वेळ समान आहे. अपवाद फक्त गडचिरोली जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्यातील चार तालुक्यांचा आहे. या ठिकाणी सकाळी निश्चित वेळेनुसार सुरु झालेले मतदान दुपारी 3.00 पर्यंत सुरु राहणार आहे. तर उर्वरीत सर्व ठिकाणी सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत मतदान पार पडणार आहे. या कालावधीत सर्वसाधारण मतदार मतदान करु शकणार आहेत. कोरोना व्हायरस संक्रमित किंवा शरीराचे तापमान विशिष्ट तापमानापेक्षा अधिक असलेल्या मतदारांना शेवटच्या अर्ध्या तासात मतदान करता येणार आहे. (हेही वाचा, Maharashtra Gram Panchayat Elections 2021: कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांनाही ग्रामपंचायत निवडणुकीत करता येणार मतदान)
निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या
ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.
कोरोना व्हायरस संक्रमित मतदारालाही मतदान करता येणार
अटी आणि शर्थींचे पालन करत ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान करता येणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस संक्रमित व्यक्ती, दोन वेळा तपासणी करुनही शरीराचे तापमान विहित निकषांपेक्षा अधिक असलेल्या मतदारांना मतदानाचा कालावधी संपण्याच्या आधी आर्ध्या तासात मतदान करता येणार आहे. त्यासाठी मतदाराला राज्य सरकार आणि आरोग्य विभागाने घालून दिलेल्या सर्व नियम आणि उपाययोजनांचे पालन करावे लागणार आहे.