महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidansabha Elections 2019) बहुमत मिळवलेल्या भाजपा (BJP) आणि त्यापाठोपाठ शिवसेनेने (Shivsena) सत्ता स्थापन करण्यासाठी असमर्थता दर्शवल्यावर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. आज संध्याकाळी 8.30 पर्यंत राष्ट्रवादीला आपली भूमिका आणि बहुमत सिद्ध करायचे आहे. याबाबत काल, राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यपालांचे पत्र प्राप्त झाले असून, आधी काँग्रेस (Congress) बरोबर चर्चा केली जाईल. त्यानंतर शिवसेना व अन्य पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करू. यानंतरच सरकार स्थापण्याचा दावा करायचा की नाही याचा निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले आहे.
सद्य घडीला राष्ट्रवादीकडे 54 व काँग्रेसकडे 44 जागा आहेत, महाआघाडीला एकतरिक्त सुद्धा 145 चा मॅजिक फिगर गाठणे शक्य नसल्याने शिवसेना पाठिंबा देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. शिवसेनेने पाठिंबा दिल्यास महा शिव आघाडीचे संख्याबळ 160 पेक्षा अधिक होऊ शकते मात्र काल, शिवसेनेच्या सत्तस्थपनेच्या मुदतीत ऐनवेळी महाआघाडीकडून देण्यात आलेली वागणूक पाहता शिवसेनेची भूमिका नेमकी काय असेल याचे अंदाज बांधता येत नाहीयेत.
दरम्यान,आदित्य ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, राज्यपालांनी शिवसेनेचा सत्तास्थापनेचा दावा फेटाळला नाही, मात्र सत्तास्थापनेसाठी उपलब्ध मुदत देखील वाढवून दिलेली नाही. सध्या राज्यातील राजकीय परिस्थितीनुसार महाशिवआघाडी हा एकमेव पर्याय उपलब्ध दिसत आहे मात्र हे ही शक्य न झाल्यास राज्य राष्ट्रपती राजवटीच्या मार्गावर जाऊ शकते. या संपूर्ण परिस्थितीत भाजपाने मात्र वेट अँड वॉच ची भूमिका स्वीकारली आहे, अशी प्रतिक्रिया काल सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांना दिली.