राज्यपालानी दिलेल्या मुदतीत सरकार स्थापन करण्यास शिवसेना अयशस्वी; काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचा सस्पेन्स कायम
Sonia Gandhi, Uddhav Thackeray And Sharad Pawar (Photo Credit: PTI)

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्याकडून शिवसेनेला देण्यात आलेला अवधी आता समाप्त झाला असून या कालावधीत सत्ता स्थापन करण्यास सेना अपयशी झाल्याचे समजत आहे. वास्तविक शिवसेनेने (Shivsena) आपल्या 58 आमदारांच्या पाठिंब्यासहीत आज राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला होता , तसेच बहुमत सिद्ध करण्यासाठी काही काळ वाढवून द्यावा अशी विनंती देखील करण्यात आली होती. मात्र काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) कडून पाठिंबा देण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्याने 145  ची मॅजिक फिगर सिद्ध करणे सेनेला जमले नाही तसेच दुसरीकडे राज्यपालांनी देखील मुदतवाढीची विनंती फेटाळून लावल्याने त्यामुळे आता सेनेची कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रात मागील 18 दिवसांपासून सुरु असणारा सत्तासंघर्षात काल सर्वाधिक मते मिळालेल्या भाजपने माघार घेतली होती. ज्यांनंतर आज शिवसेनेला राज्यपालांनी आमंत्रण दिले होते यानुसार, आज शिवसेना आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde), युवासेना अध्यक्ष व नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackrey) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांची राजभवनावर भेट घेतली होती.

काँग्रेस हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) , माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि सचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यातील मतभेदांमुळे शिवसेनेला पाठिंबा देण्यास विलंब झाल्याचे समजत होते . याबाबत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी महाआघाडीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने आपला पाठिंबा स्पष्ट न केल्याने आपणही आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवणे योग्य मानल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, आज महायुतीतून पूर्णतः माघार घेत आता शिवसेनेने राज्य आणि केंद्र या दोन्ही स्तरावरून भाजपाची साथ सोडली आहे. शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी आजच सकाळी पत्रकार परिषदेत आपण पदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्रात सत्तास्थापनाची शिवसेनेची संधी तर हुकली आहे मात्र येत्या दिवसात राज्यपाल सरकार स्थापनेसाठी महाआघाडीला आमंत्रित करते की र्जय राष्ट्रपती लागवतीच्या मार्गावर जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.