The Governor and The Maharashtra CM Letter War: राज्यपाल कोश्यारी यांच्या पत्रास मुख्यमंत्री ठाकरे यांचे प्रत्युत्तर; महाविकासआघडीची रणनिती निश्चित झाल्याचे संकेत?
Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari. (Photo Credits: PTI)

राज्यातील मंदिरे उघडण्यावरुन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना एक पत्र पाठवले. या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही 'मार्मिक' शब्द वपरत प्रत्युतर दिले. या पत्रयुद्धात महाविकासआघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांनीही उडी घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र लिहून राज्यपालांच्या भूमिकेविषयी लक्ष घालण्यााबत सूचवले. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीही मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देणारी भूमिका व्यक्त केली. याशिवाय छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि इतर नेत्यांनीह मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे स्वागत केले. यावरुन राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष तयार झाल्यास महविकासआघाडी सरकारची रणनिती तयार असल्याचेच संकेत मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे समर्थन केले. तसेच, राज्यपाल पदावर बसलेल्या व्यक्तीने मुख्यमंत्री पदाचा मान राखायचा असतो. परंतू, राज्यपालांनी लिहिलेल्या पत्रात हे दिसत नाही. स्वत: पंतप्रधानच सांगतात 'दो गज दुरी जरुरी है' त्यानुसारच सोशल डिस्टन्सींग पालन करण्यासाठी राज्यातील मंदिरे अद्यापही बंद आहेत. मंदिरे उघडली तर सोशल डिस्टन्सींग मोठ्या प्रमाणावर पाळले जात नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच आहे. राज्यपालांना व्यक्तीगत मते असू शकतात. परंतू, घटनात्मक पदांवरील व्यक्तींनी त्यांची भाषा जपून वापरली पाहिजे,’ अशी भावनाही पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्रात शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. (हेही वाचा, Sharad Pawar Writes To PM: 'राज्यपालांच्या पत्रातील भाषा वाचून मला धक्काच बसला'; NCP अध्यक्ष शरद पवार यांचे पंतप्रधानांना पत्र)

दरम्यान, राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही राज्यपालांच्या पत्रावर नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे गोवा राज्याचाही प्रभार आहे. त्यावरुन टोला लगावत राज्यपालांनी गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही असेच पत्र लिहिले आहे काय असा सवालही थोरात यांनी उपस्थित केला आहे. (हेही वाचा, महाराष्ट्रात बंद प्रार्थनास्थळावरून राज्यपाल BS Koshyari यांचे नाराजीचे पत्र; CM Uddhav Thackeray यांनी चोख प्रत्युत्तर देत विचार सुरू असल्याचे दिले संकेत!)

दरम्यान, राज्याचे अन्न आणि नागरी पुरवाठा मंत्री छगन भुजबळ यांनीही राज्यपालांच्या पत्रावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय हे कट्टर हिंदुत्ववादी आहेत. त्यांना कोणी हिंदुत्व शिकविण्याची गरज नाही. परंतू राज्यपाल राज्यपाल आहेत. त्यांना आता आम्ही काय सूचवणार असे म्हणत भूजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त करत राज्यपालांविषयी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. राज्याच्या राज्यपालांनी इंग्रजित लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्री ठाकरे यांनी मराठीत उत्तर दिलेले पत्र ऐतिहासीक असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. 'उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाचे धडे देण्याची गरज नाही, आमचं हिंदुत्व पक्क असून भक्कम पायावर उभं आहे, आमचा आत्मा हिंदुत्वाचा आहे,' असेही राऊत यांनी म्हटले आहे.