शरद पवार, महाराष्ट्र राज्यपाल, सीएम उद्धव ठाकरे (File Photo)

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून, राज्यात कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) बंद असलेली धार्मिक स्थळे (Places of Worship) उघडण्याची विनंती केली आहे. राज्यपालांनी या पत्रात टोमणा मारत विचारले आहे की, मंदिर पुन्हा चालू न करण्यासाठी उद्धव ठाकरे यांना ईश्वराकडून कोणता दैवी संकेत मिळाला आहे की काय, का ते धर्मनिरपेक्ष झाले आहेत. राज्यपालांच्या या विधानाबाबत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता राज्यपालांच्या पत्राबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष (NCP Chief) शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) एक पत्र लिहिले आहे. यामध्ये ते म्हणतात, ‘राज्यपालांचे त्यांचे वैयक्तिक मते असू शकतात. परंतु घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने त्यांची भाषा जपून वापरली पाहिजे.’

शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात राज्यपालांच्या भाषेबद्दल धक्का आणि आश्चर्य व्यक्त केले आहे. आपल्या पत्रामध्ये शरद पवार म्हणतात. ‘सध्या संपूर्ण देश कोरोना विषाणूशी लढत आहे. अशात केंद्राने सांगितलेल्या सूचनांचे सर्व राज्ये पालन करीत आहे. केंद्र सरकारने या काळात ‘दो गज की दुरी’ पाळण्यास सांगितले आहे. महाराष्ट्रामध्येही या गोष्टीचे काटेकोरपणे पालन होत आहे. आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धार्मिक स्थळे सुरु करण्याबाबत लिहिलेले पत्र समोर आले. मात्र महाराष्ट्रामध्ये अनेक धार्मिक स्थळे आहेत. सिद्धिविनायक, शिर्डीचे साई बाबा, पंढरपूर अशा ठिकाणी एरवी प्रचंड गर्दी असते. त्यामुळे जर का ही स्थळे सुरु केली तर, या ठिकाणी सामाजिक अंतराचे भान ठेऊन कोरोना नियमांचे पालन करणे कठीण होणार आहे.’

एएनआय ट्वीट -

पुढे ते म्हणतात. ‘राज्यपालांना त्यांचे वैयक्तिक मते असू शकतात. त्यांनी धार्मिक स्थळे सुरु करण्याबाबतचे त्यांचे विचार मुख्यमंत्र्यांसमोर मांडले यात गैर नाही. मात्र या पत्रामध्ये जी भाषा वापरली आहे त्यामुळे मला धक्काच बसला व आश्चर्यही वाटले.’ पुढे पवार यांनी राज्यपालांच्या पत्रामधील काही वाक्ये नमूद केली आहेत. (हेही वाचा: महाराष्ट्रात बंद प्रार्थनास्थळावरून राज्यपाल BS Koshyari यांचे नाराजीचे पत्र; CM Uddhav Thackeray यांनी चोख प्रत्युत्तर देत विचार सुरू असल्याचे दिले संकेत)

शेवटी ते म्हणतात. ‘मला खात्री आहे की आपणासही ही भाषा लक्षात आली असेल. आपल्या राज्यघटनेच्या अगदी प्रस्तावनेत 'सेक्युलर' हा शब्द जोडला गेला, जो सर्व धर्मांचे रक्षण करतो. दुर्दैवाने मा.राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात त्या शब्दाचा वेगळाच अर्थ प्रतीत होतो. माझा ठामपणे विश्वास आहे की लोकशाहीमध्ये राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये मुक्त विचारांचे आदानप्रदान झाले पाहिजे. मात्र अशावेळी वापरण्यात येणारी भाषा सांभाळून वापरली पाहिजे. राज्यपालांच्या पत्रानंतर मुख्यमंत्र्यांना याचे प्रतुत्तर देण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. मा.मुख्यमंत्री यांच्या निर्णयाचे मी पुर्ण समर्थन करतो. मी या विषयावर मा. राज्यपालांशी चर्चा केलेली नाही, नाही मुख्यमंत्र्यांशी. मला वाटले की, मी माझी व्यथा तुमच्याबरोबर आणि लोकांसमवेत शेअर केली पाहिजे.’

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूच्या काळात गेले सहा महिने अनेक निर्बंध लादले होते. आता यामध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली गेली आहे, मात्र अजूनही राज्यातील धार्मिक स्थळे बंद आहेत. अशात मंदिरे खुली करा अशा मागणीसाठी भाजप आंदोलन करत आहे. आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी याचबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. राज्यपालांनी बार-रेस्टॉरंट सुरु झाले, देवच कुलुप बंद का आहेत? हिंदुत्त्वाचा विसर पडला का? मंदिरे सुरु करु नयेत असे दैवी संकेत मिळतात का? अशाप्रकारचे प्रश्न पत्रामध्ये विचारले आहेत.