अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार 8000 ते 18000 पर्यंत आर्थिक मदत; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे निर्देश
Image For Representations (Photo Credits: Archieved, Edited)

महाराष्ट्रात सध्या सुरु असणाऱ्या राष्ट्रपती राजवटीनुसार राज्यकारभाराची सर्व सूत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांच्या हाती आली आहेत. याच अधिकारांचा वापर करत आज कोश्यारी यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केल्याचे समजते. ऑक्टोबर- नोव्हेंबर काळात झालेल्या अवकाळी पावसाने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. या नुकसानामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना किंचित दिलासा म्ह्णून आज कोश्यारी यांनी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. यानुसार, खरिपाची शेती (Kharif Crops) करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति 2  हेक्टर मागे 8000 रुपये तर बागायती (Horticulture) आणि बारमाही (Perennial) शेती करणाऱ्यांना प्रति 2 हेक्टर मागे 18000 रुपये इतकी मदत मिळणार आहे.(आमदार बच्चू कडू पुन्हा आक्रमक: 'आम्ही राजभवनावर धडकू हिंमत असेल तर अडवून दाखवा')

कोश्यारी यांच्या निर्णयानुसार केवळ आर्थिक मदतच नव्हे तर, अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या भागांना जमिनीच्या कर्जात देखील काही प्रमाणात सूट देण्यात येणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची मुले शाळा किंवा कॉलेज मध्ये शिक्षण घेत आहेत त्यांना फी मध्ये सूट देण्यात येणार आहे. या सर्व निर्णयांवर त्वरित अंमलबजावणी करण्याचे आदेश सुद्धा कोश्यारी यांनी दिले आहेत.

ANI ट्विट

दरम्यान, राज्यात अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले होते. जुलै पासून सुरु झालेला पाऊस ऑक्टोबर- नोव्हेंबरच्या मध्यपर्यांतही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीये. अशातच शेतकरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यावर ताबडतोब निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. तर दुसरीकडे हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी राज्यात सरकार उपलब्ध नसल्याने एकूणच गोंधळाचे वातावरण दिसून येत आहे. अशातच राज्यपालांच्या या मदत व सवलतीने शेतकऱ्यांना किमान दिलासा मिळू शकतो.