महाराष्ट्रामध्ये राजकीय पेचप्रसंगामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसामुळे सध्या शेतकर्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांना नुकसान भारपाई मिळावी म्हणून आज शेतकर्यांनी मुंबईतील राजभवनावर मोर्चा काढला होता. या मोर्च्यादरम्यान आमदार बच्चू कडू यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र काही वेळातच बच्चू कडू यांच्याकडून राज्यपालांना आव्हान देण्यात आलं आहे. येत्या 5 दिवसांत आम्ही राजभवनावर धडकू हिंमत असेल तर अडवून दाखवा असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आल्याने सरकारचे सारे अधिकार राज्यपालांकडे आहे. परंतू आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भेटायला वेळ न दिल्याने बच्चू कडू आणि आंदोलक शेतकरी आक्रमक झाले होते. मात्र त्यांना आज राजभवनावर जाण्यापासून रोखण्यात आले. या प्रकारानंतर पुन्हा आंदोलन तीव्र करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्रात लांबलेला परतीचा पाऊस आणि अवकाळी पावसाने झालेले नुकसान भयंकर आहे. यापार्श्वभूमीवर आता नुकसानग्रस्त शेतकर्यांसाठी केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी जोर धरत आहे. आज दुपारी बच्चू कडू यांना ताब्यात घेतल्यानंतर प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पहायला मिळाले. त्यांनी नुकसान झालेली फळं, पिकं रस्त्यावर फेकून आपला निषेध नोंदवला होता.
दरम्यान आज शेतकर्यांनी रस्त्यावर उतरून आपला निषेध नोंदवला आहे. मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांनी, आमदार, खासदारांनी ग्रामीण भागात जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे.