अजित पवार घरातून बाहेर निघाले पण गेले कोठे? गुप्त बैठकीसाठी रवाना झाल्याचे वृत्त
Ajit Pawar | (Photo Credit: Facebook)

Government Formation in Maharashtra: राजकीय बंडानंतर अगदी विजनवासात गेल्यासारख्या स्थितीत असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar ) हे अखेर आज (24 नोव्हेंबर 2019) रात्री 10 च्या सुमारास घरातून बाहेर पडले आहेत. पार्थ पवार (Parth Pawar) आणि भाजपचे सांगली येथील खासदार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) हे अजित पवार यांच्यासोबत असल्याचे समजते. अजित पवार हे आपले बंधू श्रीनिवास पाटील यांच्या चर्चगेट येथील निवासस्थानी थांबले होते.

दरम्यान, इतक्या उशीरा घराबाहेर पडलेले अजित पवार नेमके कुठे चालले आहेत याबाबत मात्र माहिती पुढे येऊ शकली नाही. काही खासगी वृत्तवाहीन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार अजित पवार यांची गाडी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान 'वर्षा' बंगल्यावर पोहोचल्याचे समजते.

दरम्यान, राज्यातून अचानकपणे मागे घेण्यात आलेली राष्ट्रपती राजवट, देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली मुख्यमंत्री पदाची आणि अजित पवार यांनी घेतलेली उप-मुख्यमंत्री पदाची शपथ, या सर्व घटना घडामोडींमध्ये राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी बाजावलेली भूमिका याबाबत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, कोणताही निर्णय न्यायालयाने दिला नाही. (हेही वाचा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ट्विटरद्वारे पहिलीच प्रतिक्रिया; पाहा कोणाकोणाचे मानले आभार)

दरम्यान, या याचिकेवर उद्या (25 नोव्हेंबर 2019) पुन्हा सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी सर्व पक्षकारांन न्यायालयाने नोटिस बजावली आहे. ही नोटीस अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनाही मिळाली आहे. त्यामुळे या नटीशिवर जेष्ठ वकिलांसोबत चर्चा करण्यासाठी अजित पवार हे गेले असल्याचे समजते.