
कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) गेले काही महिने राज्याची आर्थिक स्थिती थोडी नाजूक आहे. या काळात अनेक सरकारी प्रकल्प, पगारवाढ यांच्यावर रोख लावली होती. मात्र आता यामध्ये थोडीफार सुधारणा होत असलेली दिसत आहेत. याआधी महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून यावर्षी 15 हजार 500 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा झाली होती. आता राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतंर्गत सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना एलआयसी योजनेंतर्गत निवृत्तीनंतर देण्यात येणारे एकरकमी लाभ, दिवाळीच्या आत देण्यात येणार असल्याचे महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
मंत्रालयात अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित बैठकीत ॲड.ठाकूर बोलत होत्या. यावेळी महिला व बाल विकास विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त श्रीमती इंद्रा मालो, एलआयसी चे अधिकारी उपस्थित होते.
ॲड. ठाकूर म्हणाल्या, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू, सेवेतून काढून टाकल्यानंतर अथवा मुख्यसेविका, पर्यवेक्षिका या पदावर निवड होईपर्यंत एलआयसी योजनेतंर्गत एकरकमी लाभ देण्याबाबतची योजना राज्यात सुरु आहे. या योजनेंतर्गत सन 2020-21 या वर्षांत 900 प्रकरणे आली होती. यापैकी 875 प्रकरणांमध्ये लाभ देण्यात आला आहे. उर्वरित प्रकरणे त्रुटी असणारे आणि मागील प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करून या सेविकांची दिवाळी गोड करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे ॲड.ठाकूर यांनी सांगितले. (हेही वाचा: Diwali Bonus: मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीत मिळणार 'एवढा' बोनस)
एलआयसीमार्फत अंगणवाडी सेविकांना वयाची 65 वर्ष पूर्ण सेवानिवृत्त झाल्यानंतर एक लाख रुपये एकरकमी लाभ देण्यात येणार आहे. तसेच राजीनामा , सेवेतून काढून टाकण्यात आलेले व सेवेत कार्यरत असताना मृत्यू पावलेल्या सेविकांच्या वारसदारांसही एवढीच रक्कम देण्यात येणार आहे. मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना 75 हजार रु. रक्कम देण्यात येणार आहे.