
Gokul Milk New Rates: महागाई मध्ये रोजच वाढ होत असल्याने सध्या सामान्यांचं आर्थिक गणित बिघडलं आहे. भाजीपाल्यापासून आता दुधाचे दर देखील वाढले आहेत. अमेरिकेने शुल्क लादण्याच्या निर्णयाचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. यामुळे किरकोळ महागाईतही वाढ झाली आहे. याचा अप्रत्यक्ष परिणाम दुधाच्या किमतीवर होत आहे. दूध हा सामान्य माणसाच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. तीन दिवसांपूर्वी अमूल (Amul) कंपनीने दुधाच्या किमतीत वाढ केली होती.दुधाच्या किमतीत प्रति लिटर २ रुपयांची वाढ झाली आहे. अमूल दुधानंतर आता गोकुळ दुधाच्या (Gokul Milk) किमतीतही वाढ जाहीर करण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा ग्राहकांच्या खिशावर भार पडणार आहे.
गोकुळची दरवाढ कधीपासून?
कोल्हापूर दूध उत्पादक संघाने दुधाच्या दरात वाढ जाहीर करणारे परिपत्रक जारी केले आहे. त्यातील माहितीनुसार, कोल्हापूरहून मुंबई शहर आणि उपनगरे, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांमध्ये वितरित केल्या जाणाऱ्या गोकुळ ब्रँडच्या सर्व पॉलिथिन पॅकेजिंगमधील फुल क्रीम आणि गाईच्या दुधाच्या किमती वाढत आहेत. असोसिएशनने असेही म्हटले आहे की नवीन दर 4 मे पासून लागू होतील. पण टोन्ड (ताजे) आणि गोकुळ शक्ती दुधाच्या किमतीत कोणताही बदल होणार नाही. Mother Dairy Hikes Milk Prices: मदर डेअरीने दुधाच्या किमतीत केली प्रति लिटर 2 रुपयांची वाढ; जाणून घ्या नवीन दर.
गोकूळ दुधाच्या किंमती काय?
दूध उत्पादकांना फायदा व्हावा म्हणून दर वाढवणे आवश्यक होते, असे युनियनचे म्हणणे आहे.कोल्हापूर प्रमाणे गोकूळ दुधाला मुंबई-पुण्यामध्ये मागणी आहे.
मुंबई पुण्यामध्ये म्हशीचं दूध 72 वरून 74 रूपये प्रति लीटर
कोल्हापूरामध्ये म्हशीचं दूध 66 वरून 68 रूपये प्रति लीटर
मुंबई पुण्यामध्ये गायीच्या दूधाचा दर 56 वरून 58 रूपये प्रति लीटर
कोल्हापूर मध्ये गायीच्या दूधाचा दर 48 वरून 50 रूपये करण्यात आला आहे.
गोकूळ कडून टोन्ड आणि गोकुळ शक्ती दुधाच्या किमती वाढवल्या जाणार नाहीत. दरम्यान गोकुळ पूर्वी मे महिन्याच्या सुरूवातीला मदर डेअरी आणि अमूल कडूनही दूधाच्या दरांमध्ये वाढ जाहीर करण्यात आली आहे.