स्त्री-भ्रूण हत्या रोखण्यासाठी आजकाल ब-याच सामाजिक संघटना पुढाकार घेताना पाहायला मिळतय. या सामाजिक संघटनांसोबत आता सामान्य नागरिकही यात सहभागी झाले आहेत त्यामुळे थोड्या फार प्रमाणात का होईना पण स्त्री-भ्रूण हत्येचे (Female Foeticide) प्रमाण कमी झालेले पाहायला मिळत आहे. तसेच आजकाल सर्वच क्षेत्रात मुलींची प्रगती पाहता, समाजातील त्यांचा वावर पाहता हळूहळू प्रत्येकाला मुलीचे महत्व पटू लागले. आता मुलगी होणं ही अभिमानाची गोष्ट आहे. हाच अभिमान बाळगत पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) मधील चौगुले कुटूंबाने घरात मुलगी झाली म्हणून चक्क लोकांना मोफत चहा देऊन या चिमुकलीचे स्वागत केले.
लोकसत्ता ने दिलेल्या वृत्तानुसार, चौगुले दांम्पत्याला 2 दिवसांपूर्वी कन्यारत्न प्राप्त झाले. आपल्या कुटूंबात मुलगी झाली हे कळताच पिंपरी-चिंचवडमधील रत्ना अमृततुल्य चहा सेंटरचे मालकर स्वप्नील चौगुले आणि अक्षय राऊत यांना मोफत चहाचे वाटप केले.
हेही वाचा- मुलगी झाल्याने पतीने दिला तिहेरी तलाक, बायकोची पोलिसात धाव
15 ऑगस्टला सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत चौगुले कुटूंबियांनी रत्ना अमृततुल्य चहा सेंटरमध्ये जवळपास दोन हजार नऊशे नागरिकांना मोफत चहा दिला. आपल्या घरात आलेल्या नवीन पाहुणीचे विशेषत: मुलीचे अशा पद्धतीने स्वागत करुन आमच्यासाठी व आमच्या घरासाठी ही किती आनंदाची बातमी आहे, याची तुम्हाला कल्पना येईल, असे अक्षय राऊत म्हणाले. तसेच समाजातील स्त्री-भ्रूण हत्या रोखण्यासाठी हे छोटेसे पाऊल असून आपल्याला राखी बांधणा-या हाताला गर्भातच मारू नका, तिचे हसत-खेळत स्वागत करा, असेही ते पुढे म्हणाले.
चौगुले आणि राऊत कुटूंबियांचा हा उपक्रम हा खूपच स्तुत्यप्रिय असून यामुळे लोकांकडून या उपक्रमाच स्वागत केलं जातय.