
गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी काँग्रेस (Congress) पक्षातील सल्लागार चर्चेची प्रक्रिया उद्ध्वस्त केल्याबद्दल राहुल गांधींना जबाबदार धरून राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांनी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मंगळवारी आरोप केला की, मोदी आणि शहा यांच्या सूचनेनुसार आझाद आणि जी 23 सदस्यांनी काँग्रेस आणि गांधी कुटुंबाविरुद्ध कट रचले होते. पटोले यांनी गांधी कुटुंबावर खोटे आरोप केल्याबद्दल आझाद आणि G23 च्या इतर सदस्यांची निंदा केली.
‘काँग्रेस पक्षाने नेत्यांना विविध पदे, प्रतिष्ठा, मान-सन्मान दिले, पण पद न मिळाल्याने ते आता स्वार्थापोटी काँग्रेस पक्ष सोडत आहेत. गांधी घराण्याने या नेत्यांना सर्व महत्त्वाची पदे दिली. पण आज ते त्याच गांधी कुटुंबावर खोटे आरोप करत आहेत,’ असा दावा पटोले यांनी केला. गुलाम नबी आझाद यांनाही पक्षाने आणि गांधी परिवाराने 50 वर्षांत सर्व महत्त्वाची पदे दिली होती. पण आझाद आणि G23 नेते मोदी-शहा यांच्या इशाऱ्यावर कट रचत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
2014 च्या निवडणुकीत काँग्रेस सोडून भाजपच्या तिकिटावर खासदार झालेले पटोले पुढे म्हणाले, ‘मी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माझ्या बंगल्याची वीज आणि पाणी कनेक्शन तोडण्यात आले. पण गुलाम नबी आझाद हे लोकसभा किंवा राज्यसभेचे सदस्य नाहीत, तरी ते आपल्या सरकारी बंगल्यात राहून दिल्लीतील इतर सुविधांचा उपभोग घेत आहेत.’ मोदी-शहांच्या सूचनेनुसार आझाद काँग्रेस पक्षाची बदनामी करत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. (हेही वाचा: Shiv Sena Dussehra Rally: 'उद्धव ठाकरे गटाला शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्याचा अधिकार नाही', शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची भावना)
आज देशात गंभीर परिस्थिती आहे, सीमेवर चीनच्या कारवाया वाढल्या आहेत, संविधान धोक्यात आले आहे, मात्र भाजपला याबाबत प्रश्न न करता हे नेते काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचे काम करत आहेत, असे पटोले म्हणाले. ते पुढे म्हणाले, ‘महामार्गाचे जाळे देशभर पसरवण्याबाबत भाजप स्तःची पाट थोपटत आहे. मात्र त्यासाठी घेतलेल्या कर्जाचे व्याज म्हणून सरकारला दरमहा 44 हजार कोटी रुपये द्यावे लागतात. एवढ्या मोठ्या कर्जाचा बोजा जनतेवर टाकून महामार्गाचा विकास कसा सध्या होणार?’.