सरकार बदलत असलं तरीही महागाई काही सर्वसामान्यांचा पिच्छा सोडत नाहीय. आधीच परतीच्या पावसामुळे भाज्यांच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली होती. त्यात आता भर म्हणून की काय गॅस सिलेंडरच्या किंमतीही कडाडल्या आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने (IOC) विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 76.5 रुपयांनी वाढ झाली आहे. लोकमत ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत गॅसची किंमत 651 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. ऑक्टोबरमध्ये हिच किंमत 605 रुपये होती. तर दिल्लीत 14.2 किलोच्या विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडरसाठी 681.50 रुपये मोजावे लागणार आहेत.
व्यावसायिक गॅस सिलेंडर (19 किलो) च्या दरातही 119 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत दुकानदारांना आता व्यावसायिक सिलेंडरसाठी तब्बल 1204 रुपये मोजावे लागणार आहे. तर 5 किलोच्या सिलेंडरच्या किंमतीतही 265.50 रुपयांची वाढ झाली आहे. हे वाढलेले दर शुक्रवारी 1 म्हणजेच आजपासून लागू झाले आहेत.
मागील महिन्यात 1 ऑक्टोबरपासूनही घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली होती. त्या पाठोपाठ सलग दुस-या महिन्यात ही भाववाढ झाल्याने याची झळ सर्वसामान्यांना सहन करावी लागणार आहे. यामुळे गृहिणींचे बजेड कोलमडण्याची शक्यता आहे.
हेदेखील वाचा- मुंबई सह देशभरात गॅस सिलेंडर पुन्हा महागला; जाणून घ्या नवे दर काय?
सप्टेंबर महिन्यात हाच दर दिल्लीत 590 रुपये, मुंबईत 562 रुपये, चेन्नईत 606.50 रुपये तर कोलकत्त्यात 616.50 रुपये इतका होता. काही दिवसांपूर्वी सौदी अरेबियामध्ये ऑईल रिफायनरींवर ड्रोन हल्ला झाल्याने इंधनाचा पुरवठा कमी करण्यात आला आहे. त्याचा परिणाम आता पेट्रोल, डिझेलच्या किंमतींसोबतच आता घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतींवरही दिसून येत आहे.
ONGC आणि Indian Oil Ltd द्वारा पुरवल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूची किंमत कमी करून 3.23 डॉलर्स प्रति मिलियन ब्रिटिश थर्मल युनिट केल्याची माहिती पेट्रोलिअम प्लॅनिंग अँड अॅनालिसिस सेलकडून देण्यात आली. 1 ऑक्टोबरपासून पुढील सहा महिन्यांसाठी हे नवे दर लागू असतील. सामान्यपणे दर सहा महिन्यांनी नैसर्गिक वायूच्या किंमती निश्चित केल्या जातात. मात्र सलग तिस-या महिन्यात गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसणार हे काही वेगळं सांगायची गरज नाही.