Ganpati Festival 2019 Special MSRTC Buses: कोकणात गणेश चतुर्थी निमित्त जाणार्‍या मुंबईकरांसाठी एस टी च्या 2200 विशेष बस; आरक्षण 27 जुलैपासून  होणार  सुरू
ST Bus (Photo Credits: Twitter)

Special ST buses to Konkan for Ganpati Festival:: कोकणामध्ये गणेशोत्सव (Ganeshotsav 2019) आणि शिमगा या दोन सणांची मोठी धूम असते. रेल्वेच्या नियमानुसार चार महिने आधीपासून बुकिंग सुरू होतं आणि अल्पावधीतच हाऊसफुल्ल देखील होतं. त्यामुळे अनेकांची गणेशोत्सवात गावी जाताना गैरसोय होते. म्हणूनच यंदादेखील गणेश उत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांची मोठी गर्दी पाहता महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने सुमारे 2200 जादा गाड्या (MSRTC Buses) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज याची घोषणा केली आहे. 27 जुलैपासून गणेशोत्सव विशेष बसचं तिकीट बुकिंग सुरू होणार आहे. 2 सप्टेंबरला यंदा गणेश चतुर्थी असल्याने 28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या पहिल्या टप्प्यात विशेष बस सोडल्या जाणार आहेत. गणेश चतुर्थी निमित्त कोकणवासियांसाठी ‘पश्चिम रेल्वे’च्या स्पेशल ट्रेन्स; पहा वेळापत्रक

 

बस बुकिंग तारीख काय?

कोकणात जाणार्‍या भाविकांना 27 जुलै पासून यंदाच्या गणेशोत्सवासाठी विशेष बसची बुकिंग करता येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करणं शक्य आहे. प्रवाशांना परतीच्या प्रवासाची तिकीटंदेखील बूक करता येणार आहेत. तर ग्रुप बुकिंग करणार्‍या प्रवाशांना 20 जुलैपासून बुकिंग करता येणार आहे. एकाच गावी जाणार्‍या मुंबईकर आणि नजिकच्या प्रवाशांना ग्रुप बुकिंग करण्यासाठी नजिकच्या एस टी डेपोमध्ये संपर्क साधायचा आहे.

गणेशोत्सवाच्या काळात कोकणातून मुंबईकडे येणार्‍या प्रवाशांना सोयीचं व्हावं यासाठी 7-12 सप्टेंबर दरम्यान विशेष बस सेवा चालवली जाणार आहे. यंदा विकेंडला जोडूनचं गणपतीचं आगमन होणार असल्याने प्रवाशांची गर्दी होण्याचं प्रमाण अधिक आहे. खड्डेमय रस्ते, चौपदरीकरणाचं काम यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहन दुरूस्ती पथक आणि प्रसाधन गृह यांची सोय करण्यात आली आहे.