परळचा राजा (Photo Credits-Facebook)

सध्या देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने यंदाचे सण उत्सव नागरिकांना धामधूमीत साजरे करता येणार नाही आहेत. तर येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाचा सण या वर्षी कोरोना व्हायरसमुळे साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय मुंबईतील विविध गणेश मंडळांनी घेतला आहे. याच दरम्यान आता परळचा राजा मंडळाने सुद्धा प्रथमच एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यंदा परळच्या राजाची मूर्ती 23 फुटी नसून 3 फुटी असणार असल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परळचा राजा हा नरेपार्कचा गणपती म्हणून ओळखला जातो.

परळचा राजा मंडळाने सामाजिक अंतर राखण्यासाठी, गर्दीची संभावना टाळण्यासाठी मुर्तीची उंची कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. कोरोना व्हायरसमुळे मंडळाने हा निर्णयाचा विचार करण्याचे स्पष्ट केले आहे. मंडळाकडून यंदा कोणत्याही व्यक्तीकडून वर्गणी घेण्यात येणार नाही आहे. त्याचसोबत राजाची भव्य आगमन आणि विर्सजन सोहळण्याची मिरवणूक सुद्धा काढण्यात येणार नाही आहे. तसेच परळच्या राजाचे विसर्जन हे कुत्रिम तलावात करण्यात येणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.(Ganeshotsav 2020: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खेतवाडी गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या सेलिब्रेशन संदर्भात घेतला 'हा' महत्वाचा निर्णय)

दरम्यान, मुंबईतील गणेशोत्सव हा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हजारो- लाखो भाविक या निमित्ताने मुंबापुरीत येतात. यंदा अशी गर्दी करणे हे सर्वांसाठीच धोक्याचे ठरू शकते असे सांगत काही दिवसांपूर्वी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने सुद्धा सर्व गणेशमंडळांना यंदा उत्सव साधेपणाने साजरा करावा असे सूचित केले होते. यावर अद्याप अनेक मोठ्या मंडळांचा निर्णय होणे शिल्लक आहे.