मुंबईतील (Mumbai) लोकांसाठी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ (Hindu Hriday Samrat Balasaheb Thackeray) दवाखान्या अंतर्गत 227 मोफत आरोग्य सेवा केंद्र उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी याची घोषणा केली. 2 ऑक्टोबरपासून मुंबईकरांच्या सेवेसाठी ही केंद्र सुरु होतील. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या केंद्रांवर तब्बल 139 वैद्यकीय चाचण्या मोफत केल्या जातील आणि ही केंद्रे बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) चालवेल. पहिल्या टप्प्यात 50 आरोग्यसेवा केंद्रे सुरू केली जातील.
यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहात आढावा बैठक घेतली, नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी झोपडपट्टी भागात फिरत्या वैद्यकीय युनिटची संख्या वाढवावी. या व्यतिरिक्त, मॅमोग्राफीसाठी मोबाईल व्हॅनही सुरू करा, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. सध्या या दवाखान्यांचे काम 50 ठिकाणी पूर्ण झाले आहे.
शहराच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात 227 दवाखाने उभारले जातील आणि 227 क्लिनिकपैकी 34 हे पॉलीक्लिनिक असतील. पॉलीक्लिनिक्सद्वारे तज्ज्ञांच्या सेवा उपलब्ध होणार आहेत. क्लिनिक दोन स्वरूपात चालवले जाईल- पोर्टा केबिन आणि काँक्रीट केबिन. प्रति 25-30,000 लोकांमागे एक क्लिनिक असेल. सकाळी 7 ते 2 आणि दुपारी 3 ते 10 या दोन सत्रात क्लिनिक सुरु राहील, ज्या वेळा नागरिकांच्या सोयीनुसार ठरवण्यात आल्या आहेत. (हेही वाचा: अनिश्चित पावसामुळे मुंबईत साथीचे आजार बळावले; डेंग्यू, लेप्टोपायरसीस रुग्णांमध्ये वाढ)
क्लिनिकमध्ये एक एमबीबीएस डॉक्टर, एक नर्स, एक फार्मासिस्ट आणि बहुउद्देशीय कामगार असतील. माहिती आणि तंत्रज्ञानाद्वारे रुग्णांची नोंदणी केली जात आहे. बीएमसी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी याबाबत माहिती दिली.