लातूर महानगरपालिकेने (Latur Municipal Corporation) महिलांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. याठिकाणी महिलांसाठी मोफत बससेवा (Free Bus Service) सुरू केली आहे. याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की देशातील अशा प्रकारची ही पहिलीच बस सेवा आहे. या मोफत बससेवेचे उद्घाटन शुक्रवारी रात्री महाराष्ट्राचे मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते शिवाजी चौकात करण्यात आले. यावेळी मंत्री देशमुख म्हणाले की, महिलांना बसमध्ये मोफत प्रवास करण्यासाठी स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. अमित देशमुख यांनी पुढे सांगितले की, बसमध्ये महिला कंडक्टर असतील आणि योजनेशी संबंधित कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी केली जाईल.
शासनाच्या या योजनेमुळे लातूरमध्ये येणाऱ्या हजारो विद्यार्थिनींनाही मदत होणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. यासोबतच मंत्री अमित देशमुख यांनी एलएमसीच्या परिवहन समितीला प्रदूषणाचा सामना करण्यासाठी पर्यावरणपूरक इंधन आणि विजेवर बस चालवण्याकडे लक्ष देण्यास सांगितले. महिलांसाठी मोफत बससेवेच्या उद्घाटन समारंभाला महापालिकेचे मुख्याधिकारी अमन मित्तल, महापौर विक्रांत गोजमुंडे यांचीही उपस्थिती होती.
याआधी लातूर महानगरपालिकेने 2021 मध्ये महिला आणि मुलींना बसमध्ये मोफत प्रवास करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी पालिका प्रशासनाची महापौर विक्रांत गोजमुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. महिलांना स्मार्ट कार्डद्वारे मोफत प्रवास करता येणार आहे. लातूरमध्ये आता हजारो महिला व विद्यार्थिनींना मोफत बससेवेचा लाभ घेता येणार आहे. (हेही वाचा: Mumbai: रेल्वे स्थानकांबाहेरील 100 मीटरचा परिसर होणार फेरीवाला मुक्त; BMC आणि पोलीस करणार कारवाई)
यापूर्वी दिल्ली या केंद्रशासित प्रदेशात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने दिल्लीमध्ये महिलांना मोफत सिटी बस सेवा उपलब्ध करून दिली होती. आता अशी मोफत बस सेवा देणारी लातूर महानगर पालिका देशातील पहिली महानगर पालिका ठरली आहे. लातूर महानगरातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा निर्माण व्हायात यासाठी प्रॉपर्टी टॅक्सला जोडून हेल्थ कार्ड सुरु करण्याचाही मनोदय पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी बोलून दाखविला.