Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावे बनावट धनादेश (Forged Cheques) देऊन बँकांची फसवणूक केल्याप्रकरणी ठाण्याच्या (Thane) डोंबिवली, मानपाडा पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. हे लोक आपल्या मौजमजेसाठी कंपन्यांची आणि बँकांची फसवणूक करायचे. या लोकांनी महाराष्ट्राशिवाय इतर राज्यातही फसवणूक केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. फसवणूक करण्यासाठी, आरोपी प्रथम अशा कंपन्यांचा शोध घ्यायचे ज्यांचे संबंधित बँकेत खाते आहे. यानंतर हे लोक कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आणि त्यांच्या हालचालींवर सतत नजर ठेवायचे. या दरम्यान ते धनादेशाचा तपशील गोळा करायचे आणि नंतर त्याच कंपनीच्या नावाने बनावट धनादेश तयार करून बँकेतून पैसे काढायचे.

पोलिसांनी आरोपींविरुद्ध फसवणुकीचे असे पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत. मानपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात त्यांना बँकेतून एक फोन आला, ज्यामध्ये बँकेने सांगितले की एका व्यक्तीकडे कंपनीच्या नावाचा 21 कोटी रुपयांचा धनादेश आहे आणि बँकेला त्या व्यक्तीवर संशय आहे. ही माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तेथे पोहोचले व त्यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान, पोलिसांनी नोंदी तपासल्या आणि तपासाच्या तपशिलांमध्ये काही तफावत आढळून आली.

त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली. या व्यक्तीने काहीही उघड केले नाही, परंतु टेक्निकल डिटेल्सद्वारे पोलिसांनी त्याच्या साथीदारांनाही पकडले. आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असलेल्या अशा कंपन्यांच्या बँक खात्यांवर आरोपी लक्ष ठेवायचे. यासोबतच गेल्या काही वर्षांत पैसे न काढणाऱ्या अशा लोकांवरही त्याची नजर होती. अहवालात म्हटले आहे की, आरोपींना कथितपणे बँकेच्या आतूनही मदत मिळायची आणि नंतर त्यांचे गुप्तचर पथक कंपनीचे तपशील, त्यांचे व्यवहार, खाते आणि गुंतवणूकीचे तपशील, चेक बुकची माहिती तसेच खातेदाराच्या स्वाक्षरीचा फोटो अशा गोष्टी पुरवायचे.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, मानपाडा पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्येही त्यांनी अशीच फसवणूक केली आहे. त्याच्यावर 9 गुन्हे दाखल आहेत. आमची टीम बँकेतील अशा लोकांच्या शोधात आहे जे त्यांना आतून तपशील आणि मदत देत होते.’