Param Bir Singh | (Photo Credits-ANI)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त (Former Mumbai Police Commissioner) परमबीर सिंह (Param Bir Singh) हे चंदिगढ (Chandigarh) येथे असल्याचे वृत्त आहे. परमबीर सिंह यांना न्यायालयाने फरार घोषीत केले होते. त्यामुळे ते नेमके कोठे आहेत याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. मुंबई पोलिसही परमबीर सिंह यांच्या मागावर होते. दरम्यान, एबीपी माझाने आपल्या वृत्तात दावा केला आहे की, परमबीर हे सध्या चंदिगढ येथे आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करुन परमबीर सिंह यांनी खळबळ उडवून दिली होती. दरम्यान, अनिल देशमुख यांच्या विरोधात तक्रार करुन परमबीर सिंह हे स्वत:च गायब झाले होते. त्यामुळे ते नेमके कोठे आहेत? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते.

परमबीर सिंह हे देशाबाहेर पळाल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. प्रसारमाध्यमांतूनही बातम्या आल्या होत्या. दरम्यान, जोपर्यंत तक्रारदार असलेले परमबीर सिंह हे हजर होत नाहीत तोपर्यंत त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी होणार नाही, असा सज्जड दम न्यायालायने परमबीर सिंह यांच्या वकिलांना भरला होता. त्यानंतर परमबीर सिंह यांच्या वकिलांनी कोर्टात दावा केला होता की, परमबीर हे फरार नसून ते देशातच आहेत. मात्र, मुंबई पोलिसांकडून त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे ते लपून बसले आहेत. (हेही वाचा, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांचा ठावठिकाणा लागल्यावरच होणार सुनावणी - सर्वोच्च न्यायलय)

दरम्यान, परमबीर सिंह यांनी प्रतिक्रिया दिल्याचा दावा करत दिलेल्या वृत्तात एबीपी माझाने म्हटले आहे की, परमबीर सिंह हे सध्या चंदीगढ येथे आहेत. तसेच, न्यायालयाने दिलेले निर्देश, सूचना आणि सर्व अटींचे पालन करुन ते सहकार्य करणार असल्याचेही परमबीर सिंह यांनी म्हटल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे.