Kadaknath chicken Scam Case: स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी ( Former MP Raju Shetty,) हे अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) कार्यालयात पोहोचले आहेत. सांगली, सातारा पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रासह उर्वरीत महाराष्ट्रात चर्चित असलेल्या कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणात लेखी तक्रार देण्यासाठी राजू शेट्टी हे ईडी कार्यालयात पोहोचल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
राजू शेट्टी यांनी कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणात राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या जावयांवर अनेकदा आरोप केले आहेत. टीव्ही 9 या वृत्तवाहिणीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, कडकनाथ कोंबडी पालन आर्थिक घोटाळा प्रकरणात राजू शेट्टी यांनी ईडी कार्यालयाकडे धाव घेतली आहे. ते ईडी कार्यालयात दाखल झाले असून, या घोटाळा प्रकरणात ते लेखी तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.
कडकनाथ कोंबडी पालन आर्थिक घोटाळा प्रकरणात पोलीस तक्रार दाखल झाली आहे. महारयत एॅग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कमी पैशात दुप्पट उत्पन्न अशी जाहिरात करत अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. पुणे येथील दत्तवाडी येथे हा गुन्हा दाखल झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्यातील इतरही विविध जिल्ह्यांमध्ये या प्रकरणात पोलीस तक्रारी दाखल झाल्याचे समजते. (हेही वाचा, कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसाय घोटाळा: आठ हजार शेतकऱ्यांची 500 कोटींची फसवणूक; जवळच्या पोलीस स्थानकात दाखल करू शकता तक्रार)
दरम्यान, या प्रकरणी पुणए पोलीसांनी प्रीतम माने नामक एका व्यक्तीस यापूर्वीच अटक केली आहे. महारयत एॅग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अध्यक्ष सुधीर शंकर मोहिते, संचालक संदीप सुभाष मोहिते, (दोघेही रा. इस्लामपूर, सांगली) यांच्यासह हनुमंत शंकर जगदाळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश शिवाजी आंबोडे (वय 35 वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दत्तवाडी पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, या घोटाळ्याबद्दल सांगितले जाते की, कमी पैशात दुप्पट उत्पन्न अशी जाहिरात करत महारयत एॅग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने शेतकऱ्यांना आकृष्ट केले. अनेक शेतकरी आणि नागरिकांनी त्यात गुंतवणूकही केली. मात्र पुढे त्या घोटाळा झाल्याचा दावा अनेकांनी केला आहे.