कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसाय घोटाळा: आठ हजार शेतकऱ्यांची 500 कोटींची फसवणूक; जवळच्या पोलीस स्थानकात दाखल करू शकता तक्रार
प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

शेतीला पूरक असा व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील सांगली, इस्लामपूर भागात कडकनाथ (kadaknath) कोंबडी पालन व्यवसायात शेतकऱ्यांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली असल्याची माहिती समोर येत आहे. इस्लामपूर येथील महारयत अॅग्रो कंपनीच्या संचालकांनी हा गंडा घातला आहेत. सोमवारी शेतकऱ्यांनी एकत्र जमून या कंपनीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. यासंबंधी शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करावा असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी केले आहे.

कडकनाथ कुक्कुटपालन प्रकरणात राज्यभरात 8 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. यामध्ये तब्बल 500 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचे उघडकीस आले आहे. ज्या व्यक्तीने ही फसवणूक केली आहे ती व्यक्ती राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी संबंधित असल्याचा आरोपही राजू शेट्टी यांनी केला आहे. कडकनाथ कुक्कुटपालन प्रकल्पात गुंतवणूक करुन रक्कम दुप्पट, तिप्पट करून देतो असे आमिष शेतकऱ्यांना दाखवण्यात आले होते. मात्र शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा परतावा न देता कंपनीचे मालक फरार झाले आहेत. (हेही वाचा: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा: अजीत पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या 50 बड्या नेत्यांवर गुन्हे दाखल)

याबाबत मालक सुधीर मोहिते यांनी सोशल मिडीयावर, कोणताही घोटाळा झाला नसल्याचे सांगितले आहे, तसेच मी कोणत्याही चौकशीसाठी समोर जाण्यास तयार असल्याचेही ते म्हणाले आहेत. या कोंबड्याच्या मांसाला परदेशात मागणी असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र हे मांस तिथपर्यंत पोहचलेच नाही. शेतकऱ्यांनी हजारो रुपये गुंतवून या कोंबड्या घेतल्या, व्यवसायाला सुरुवात केली मात्र कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.